मुंबई : गतविश्वचषक स्पर्धेनंतर आॅस्टे्रलियाने ज्या प्रकारे २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती, अगदी त्याचप्रमाणे भारतानेदेखील पुढील २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करणे आवश्यक असल्याचे मत माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी अजून चार वर्षे आहेत. मात्र एकूणच आॅसींचे विजेतेपद पाहता त्यांनी कशा प्रकारे तयारी केली होती, हे लक्षात येईल. कर्णधार मायकल क्लार्क सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तंदुरुस्त नसताना त्यांनी संघाची धुरा स्टीव्हन स्मिथकडे न देता जॉर्ज बेलीकडे दिली होती, असे सांगतानाच बोर्डे म्हणाले, की विश्वचषकापूर्वी भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये कर्णधार म्हणून स्टीव्हन स्मिथने आॅस्टे्रलियाला विजय मिळवून दिला होता. याविषयी आणखी बोलताना बोर्डे म्हणाले, की आॅसींच्या या निर्णयावरून असे दिसते, की अशा अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली होती. आपल्यालादेखील अशीच तयारी करावी लागेल. आॅस्टे्रलियाच्या मजबूत फळीविषयी बोर्डे म्हणाले, की जेव्हापासून क्लार्क तंदुरुस्त झाला, त्या सामन्यापासून बेलीला संपूर्ण स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. यावरूनच आॅस्टे्रलियाची मजबूत स्थिती कळून येते. त्यामुळे आॅस्टे्रलियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी स्वत:ला कशा प्रकारे तयार केले, याची कल्पना येते. (क्रीडा प्रतिनिधी)
भारताने आॅस्ट्रेलियाप्रमाणे तयारी करावी : चंदू बोर्डे
By admin | Published: March 30, 2015 11:55 PM