ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १ - भारताविरोधात दुसरा कसोटी सामना खेळणा-या न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली आहे. भारत पहिल्या डावात 316 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघाला भारताने मजबूत होण्याची काहीच संधी दिली नाही. पहिल्या तीन ओव्हरमध्येच फक्त 18 धावांवर न्यूझीलंडचे दोन गडी बाद झाले होते. रॉस टेलर आणि ल्यूकने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला पण तेदेखील जास्त वेळ टिकू शकले नाही. दुस-या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंडने 128 धावा केल्या असून 7 गडी बाद झाले आहेत.
भुवनेश्वर कुमारने सर्वोत्तम गोलंदाजी केली असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शामी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी एक - एक विकेट घेतली आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 316 धावांवर संपुष्टात आला. हेन्रीच्या गोलंदाजीवर बोल्टने सूर मारत अप्रतिम झेल पकडत मोहम्मद शमीला 14 धावांवर बाद केले आणि भारताची खेळी संपुष्टात आली. वृद्धीमान सहा 54 धावांवर नाबाद राहिला.
भारताने आपल्या घरच्या 250 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु पहिल्या दिवशीच भारताची सुरुवात खराब झाली. दुस-या दिवसाचा खेळ 7 बाद 239 वरून सुरू झाला. वृद्धीमान सहा व जाडेजाने संयमी खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र 272 धावा झालेल्या असताना वॅगनरच्या गोलंदाजीवर जडेजा 14 धावांवर बाद झाल्याने भारताला आठवा धक्का बसला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या साथीने वृद्धीमान सहाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र भुवनेश्वर (5) तर मोहम्मद शामी 14 धावांवर बाद झाल्याने सहाची एकतर्फी अर्धशतकी (नाबाद ५४) खेळी व्यर्थ ठरली.
न्युझीलंडतर्फे हेन्री तीन तर बोल्ट, वॅगनर व पटेलने प्रत्येकी दोन तर सँटनरने एक बळी टिपला.