हैदराबाद : अनिकेत चौधरीच्या अचूक माऱ्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी खेळल्या जात असलेल्या दोनदिवसीय सराव सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर बांगलादेशविरुद्ध वर्चस्व गाजवले. डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेतने अचूक मारा करताना २६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेश संघाने नियमित अंतरात विकेट गमावल्यानंतर त्यांनी ६७ षटकांत ८ बाद २२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशतर्फे सौम्या सरकार (५२) आणि कर्णधार मुशफिकुर रहीम (५८) यांनी अर्धशतके झळकावली. शब्बीर रहमान (३३) व महमुदुल्लाह (२३) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले, तर लिटन दास २३ धावा काढून नाबाद राहिला. भारत ‘अ’ संघातर्फे चामा मिलिंद, विजय शंकर, शहाबाज नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने सलामीवीर फलंदाज व कर्णधार अभिनव मुकुंदच्या (१६) मोबदल्यात दिवसअखेर १ बाद ९१ धावांची मजल मारली. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाल ४० धावांवर खेळत असून, त्याला दुसऱ्या टोकाकडून श्रेयस अय्यर (२९) साथ देत होता. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. भारत ‘अ’ संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश असलेल्या मुकुंदने निराश केले. त्याला केवळ १६ धावा फटकावता आल्या. वेगवान गोलंदाज शुभाशिष रॉयच्या गोलंदाजीवर तो इमरुल कायेसकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर पांचाल व अय्यर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. त्याआधी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. कायेस केवळ ४ धावा काढून चामा मिलिंदचा लक्ष्य ठरला. चौधरीने तमीम इक्बाल (१३) व मोमिनुल हक (५) यांना माघारी परतवत बांगलादेशची ३ बाद ७२ अशी अवस्था केली. सौम्या सरकारने ७३ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. त्याला नदीमने तंबूचा मार्ग दाखविला. कुलदीपने महमुदुल्लाह याला माघारी परतवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. मुशफिकुर व शब्बीर यांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पण शंकरने शब्बीरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. मुशफिकुर अर्धशतकी खेळी केल्यानंतर चौधरीचे लक्ष्य ठरला. त्याने १०६ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एक षटकार लगावला. चौधरीने मेहदी हसनला (०) खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविताना आपला चौथा बळी नोंदवला. त्यानंतर काही वेळाने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुरने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
भारत ‘अ’ संघ मजबूत स्थितीत
By admin | Published: February 06, 2017 1:41 AM