ब्रिस्बेन : नमन ओझा (११०) व उमेश यादव (९०) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात आज तिस-या दिवशी मंगळवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या डावात दमदार मजल मारली. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील ४२३ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात ५०१ धावा फटकाविल्या. अंधुक प्रकाशामुळे आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला केवळ १ चेंडू खेळता आला होता. यजमान संघाला पाहुण्या संघाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ७८ धावांची गरज असून त्यांच्या सर्व विकेट शिल्लक आहेत. मधल्या फळीतील फलंदाज ओझाने या मालिकेत कामगिरीत सातत्य राखताना शतकी खेळी केली. ओझाने १३४ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. भारताच्या डावात तळाच्या फळीतील उमेश यादवची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. यादवने ६६ चेंडूंमध्ये ११ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने ९० धावांची आक्रमक खेळी केली. बेन कटिंगने यादवला तंबूचा मार्ग दाखवीत भारताचा डाव संपुष्टात आणला. ओझालाही कटिंगने माघारी परतवले. याव्यतिरिक्त अमित मिश्राचे (३६ धावा, ६७ चेंडू, ६ चौकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. ओझा व मिश्रा यांनी ८२ धावांची भागीदारी केली. जसप्रित बुमराह १६ धावा काढून नाबाद राहिला. त्याआधी, कालच्या ३ बाद १६५ धावसंख्येवरून पुढे खेळताना बाबा अपराजित (२८) व मनोज तिवारी (६३) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. अंबाती रायडूने ६० चेंडूंना सामोरे जाताना ४० धावांचे योगदान दिले. अनुरित सिंग (८) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यादवने अनुरित सिंगसोबत दहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. अंधुक प्रकाशामुळे आज तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबविण्यात आला. त्या वेळी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे फिलिप ह्यूज व अॅलेक्स डुलन खेळपट्टीवर होते. त्याआधी, आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे बेन कटिंगने २६.२ षटकांत १०० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. कटिंगने ओझा, मिश्रा, अनुरित सिंग आणि उमेश यादव यांना माघारी परतवले. चाड सेयर्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३० षटकांत ८४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले तर मोर्न मार्शने २६ धावांत एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
भारत ‘अ’ची दमदार मजल
By admin | Published: July 16, 2014 2:35 AM