हैदराबाद : टीम इंडियाची अलीकडची कामगिरी खराब आहे; पण पुढील वर्षी आपल्याच खेळपट्टीवर आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा अन्य संघांसोबतच भारतही प्रबळ दावेदार असल्याचे मत वेस्ट इंडीजचा मातब्बर फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने गमावली. येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाराने पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी तो म्हणाला, वेस्ट इंडीज संघाबाबतही लाराने मत मांडले. सध्याच्या विंडीज संघाचा मेंटॉर म्हणून भूमिका वठविण्याचा विचार आहे काय, असे विचारताच तो म्हणाला, ‘‘मी मेंटॉर किंवा कोच ही भूमिका स्वीकारली तरी काही विशेष फरक पडेल, असे मला वाटत नाही. समस्या गंभीर आहे आणि तिची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. आमच्याकडे पायाभूत सुविधा फारच तोकड्या असून, प्रशासकीय स्तरावरील कामही सुमार आहे. अशा वेळी कुणी जादूची कांडी फिरवून राष्ट्रीय स्तरावर बदल घडवून आणेल असे वाटत नाही.’’तो पुढे म्हणाला, ‘‘माझ्या मते, विंडीजकडे जगात सर्वांत प्रभावी खेळाडू आहेत; पण त्यांना साधारण दर्जाचे खेळाडू बनविण्यात येते. आमच्याकडे चांगल्या प्रशासनाची गरज आहे. मी काही करू शकतो; पण त्यासाठी पायाभूत स्तरावर सुधारणा घडवून आणावीच लागेल.’’ तू वेळेआधी निवृत्ती घेतली असे वाटते का, या प्रश्नाच्या उत्तरात लारा म्हणाला, ‘‘मी एक-दोन विक्रम आणखी नोंदवू शकलो असतो; पण विक्रमासाठी खेळलो नाही. १२ हजार धावा महत्त्वाच्या नाहीत. मी ज्या संघांविरुद्ध खेळलो, त्यांच्यासोबत खेळाचा आनंद लुटला.’’ मला भारतातील प्रत्येक शहर आवडते. क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाचे नवल वाटते. सचिन, लक्ष्मण, द्रविड, धोनी, कोहली हे क्रिकेटला समर्पित असलेले मित्र मी भारतात मिळविले, याचा आनंद वाटतो, असे लाराने आवर्जून सांगितले. (वृत्तसंस्था)
भारत टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार
By admin | Published: October 14, 2015 11:52 PM