औपचारिक वन डे मालिका : बांगलादेशाविरुद्ध आज निर्णायक लढत
बंगळुरू : बांगलादेश अ संघाविरुद्ध दुसरा अनधिकृत एकदिवसीय सामना गमावल्यानंतर भारत अ संघ रविवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या लढतीत विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या वज्रनिर्धाराने उद्या (रविवारी) मैदानात पाऊल ठेवेल.या मालिकेत भारत अ संघाने पहिला सामना ६५ धावांनी जिंकला; परंतु दुसऱ्या सामन्यात बांगलादेशाकडून ९६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी २ आॅक्टोबरपासून मालिका खेळणार आहे. त्यासाठी ३० संभाव्य संघांंत समाविष्ट असणारे भारतीय खेळाडू बांगलादेश अविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत.भारत अ संघात असणारे स्टार फलंदाज सुरेश रैना, कर्णधार उन्मुक्त चंद, सलामीवीर मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, गुरकीरतसिंग आणि रिषी धवनशिवाय मनीष पांडे, केदार जाधव, लेगस्पिनर कर्ण शर्मा, वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांच्यासारख्या खेळाडूंवर मुख्य रूपाने मालिका जिंकण्यासाठी मदार असेल.पहिल्या सामन्यात ६५ धावा आणि गोलंदाजीत ५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा गुरकीरतसिंग मान दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही; परंतु तो तिसऱ्या सामन्यात आपला ठसा उमटवण्याच्या इराद्याने खेळेल. याशिवाय, दुसऱ्या लढतीत अर्धशतक ठोकणारा कर्णधार उन्मुक्त चंदसोबत सलामीवीर मयंक अग्रवाल व दुसऱ्या लढतीत ३ बळी घेणारा वेगवान गोलंदाज रिषी धवन यांच्या खांद्यावरही जबाबदारी असेल.स्टार फलंदाज सुरेश रैनाकडून विशेष अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या; परंतु तो सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या सामन्यात १६ व दुसऱ्या सामन्यात फक्त १७ धावा केल्या होत्या. तसेच, मनीष पांडेही विशेष कामगिरी करू शकला नाही.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघ पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने खेळेल आणि त्यांचे लक्ष हे मालिका जिंकण्यावर असेल. फलंदाजीत मयंक अग्रवाल, उन्मुक्त, मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. तसेच, गोलंदाजीत पुन्हा एकदा २५ वर्षीय गुरकीरतवर मदार असेल.दुसरीकडे, पाहुण्या संघात जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू नाहीत; परंतु त्यांचाही प्रयत्न हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा असेल. दुसरी लढत ९६ धावांनी जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. ही लढत दोन्ही संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशीच आहे.दुसऱ्या सामन्यात ३६ धावांत ५ गडी बाद करणाऱ्या नासीर हुसेनने अष्टपैलू कामगिरी केली होती व नाबाद १०२ धावांची शानदार खेळी केली होती. त्याने पहिल्या सामन्यातदेखील ५२ धावा केल्या होत्या. फलंदाजीत यष्टिरक्षक लिट्टन दास, कर्णधार मोमीनुल हक, सलामीवीर रोनी तालुकदार आणि सौम्या सरकार यांच्यावरही त्यांची मदार असेल. तथापि, गोलंदाजीत तस्कीन दुखापतीमुळे उद्या खेळू शकणार नाही. त्याची उणीव भरून काढण्याची जबाबदारी रुबेल हुसेन आणि अमीन हुसेन यांच्यावर असेल. (वृत्तसंस्था)