नवी दिल्ली : क्रीडाविश्वात भारताने अद्याप गरुडझेप घेतलेली नाही. पण प्रतिबंधित औषध सेवनात मात्र भारताने सलग तिसऱ्या वर्षी तिसरे स्थान पटकावल्याची माहिती विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या(वाडा) ताज्या अहवालात दिली आहे. २०१५ पासून एकूण ११७ खेळाडू दोषी आढळल्याचे वाडाने सांगितले.वाडाने डोपिंगची जी प्रकरणे तपासली आणि त्यातून निष्कर्ष काढल्यानुसार भारतापेक्षा अधिक आकडा रशियाचा आहे. रशियाचे १७६, आणि इटलीचे १२९ खेळाडू दोषी आढळल्याने ही दोन्ही राष्ट्रे पहिल्या दोन स्थानावर आहेत. भारत २०१३ आणि २०१४ मध्येही तिसऱ्या स्थानी कायम होता. भारतीयांची डोपिंग परीक्षणे लघवीच्या नमुन्याद्वारे तपासण्यात आली. ही चाचणी २०१५ दरम्यान घेण्यात आली होती. वाडाने विविध मान्यताप्राप्त डोपिंग विरोधी संस्थांकडून यंदा ३१ जानेवारीपर्यंत विश्लेषणात्मक निष्कर्ष काढले. शिवाय प्रतिबंधांबाबत माहिती एकत्र केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे. वाडाच्या संशोधित नियमानुसार हा तिसरा अहवाल आला आहे, भारतासाठी चिंतेची बाब अशी की या तिन्ही वर्षांत दोषी खेळाडूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाडाने २०१३ मध्ये ९१ आणि २०१४ मध्ये भारताच्या ९६ खेळाडूंना दोषी धरले होते. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन हा मोठा गुन्हा असून याअंतर्गत खेळाडूंवर बंदीची कारवाई केली जाते. २०१५ पासून भारताचे जे ११७ खेळाडू दोषी आढळले त्यात दोन खेळाडू एडीआरव्ही (नमुना देण्यास टाळाटाळ करणारे खेळाडू) आहेत. ११५ खेळाडू नमुन्यात प्रतिबंधित द्रव्य आढळून आलेले आहेत. त्यात ७८ पुरुष आणि ३७ महिलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)>प्रतिबंधित औषध सेवनात दोषीभारोत्तोलन:३२ पुरुष २४ महिला, अॅथ्लेटिक्स १४ पुरुष ७ महिला, बॉक्सिंग ८, कुस्ती ८, सायकलिंग ४, कबड्डी ४, जलतरण ३, पॉवर लिफ्टिंग ३, ज्युडो २, वुशू २, रोर्इंग आणि बॉडी बिल्डिंग प्रत्येकी १, हॉकी १, फुटबॉल १, स्ट्रीट हॉकी १ अशी भारतातील दोषी खेळाडूंची संख्या आहे.
डोपिंगमध्ये सलग तिसऱ्यांदा भारत तिसऱ्या स्थानी
By admin | Published: April 05, 2017 12:14 AM