एंटवर्प : सुरुवातीच्या दोन्ही लढतींत चढउतारांचा सामना करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला शुक्रवारी वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्यफेरीच्या ‘अ’ गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे अवघड आव्हान असेल. एशियाडचा सुवर्णविजेता भारत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेत्या पाक यांच्यातील या सामन्याची स्पर्धास्थळी मोठी चर्चा होत आहे.गोल नोंदविण्याच्या अनेक संधी गमावणाऱ्या भारताच्या जमेची बाजू अशी, की हा संघ २०१६च्या रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरला आहे. तरीही पाकविरुद्ध विजय नोंदविण्यात कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नाही. पाकच्या नजरा आॅलिम्पिक पात्रता गाठण्याकडे असतील. या सामन्यात जो जिंकेल, त्या संघाला क्वार्टरफायनलमध्ये आवडीचा ड्रॉ मिळेल. दोन्ही संघांत भुवनेश्वर येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तणावपूर्ण लढतीनंतरचा हा पहिलाच सामना असेल. त्या सामन्यात पाकच्या काही खेळाडूंनी मैदानात असभ्य वर्तन केले होते. त्यामुळे निलंबनाची कारवाईदेखील झाली. त्या घटनेचा ताण अद्याप दोन्ही संघांत जाणवत असला, तरी उद्याच्या सामन्यात आकर्षक शैलीची हॉकी पाहायला मिळेल, यात शंका नाही. या सामन्याआधी दोन्ही संघांच्या आक्रमक फळीने काही चुका केल्या; पण भारताने दोन्ही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात फ्रान्सला ३-२नी नमविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पोलंडचा ३-०नी फडशा पाडला होता. कोच पॉल वान एस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आतापर्यंत चांगलाच खेळ केला. दुसरीकडे, पाकला पोलंडला २-१नी हरविल्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून १-६ नी पराभवाचा धक्का बसला होता. भारतीय संघातील अनेक खेळाडू जखमी असल्याने कोचने नव्या रक्ताला संधी दिली. दुसरीकडे, पाकचा संघ तगडा वाटतो. पाकचे कोच शहनाझ शेख म्हणाले, ‘‘आम्ही इंचियोन एशियाड आणि भुवनेश्वरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळलेल्या संघात बदल केला नाही. हा सामना आमच्यासाठी ‘करा किंवा मरा’ असाच असेल.’’ पाकसाठी ही स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता गाठण्याची अखेरची संधी राहील. हा संघ एशियाडच्या अंतिम सामन्यात भारताकडून पराभूत झाला होता. या स्पर्धेत आघाडीचे स्थान घेणारे तिन्ही संघ भारतात डिसेंबर महिन्यात आयोजित विश्व हॉकी लीगच्या अंतिम स्पर्धेत सहभागी होतील. (वृत्तसंस्था)
भारताची आज पाकविरुद्ध लढत
By admin | Published: June 26, 2015 1:15 AM