मुंबई : सलामीवीर जाफर इक्बालची नाबाद अर्धशतकी खेळी आणि गणेश मुंडकरच्या नाबाद तुफानी ४४ धावांच्या जोरावर गतविजेत्या भारताने दक्षिण अफ्रिकाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह अंध टी२० विश्वचषक स्पर्धेत यजमान भारताने विजयी घोडदौड कायम राखताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण अफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात ८ बाद १५१ धावांची मजल मारली. त्याचवेळी, षटकांची गती न राखल्यामुळे भारतीय संघाला ६ धावांचा दंड मिळाला. यामुळे, भारतासमोर १५८ धावांचे लक्ष होते. परंतु, याचा भारतीयांनी आपल्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.सलामीवीर दुर्गा राव आणि इक्बाल जाफर यांनी पहिल्या षटकापासून आफ्रिकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. माथापोने दुर्गारावला (१९) बाद करत आफ्रिकाने भारताला एकमेव धक्का दिला. यानंतर मात्र यजमानांनी एकही बळी नगमावता दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. इक्बालने दमदार फटकेबाजी करताना नाबाद ५० धावांची खेळी केली. दरम्यान, दुसरीकडे मोहम्मद फरहान (२१) जायबंदी होत तंबूत परतला. यानंतर गणेश मुंडकरने मैदानात येताच धावांची बरसात केली. गणेशने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ चेंडूत ४४ धावा केल्या. इक्बाल - मुंडकर या जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहताना भारताला १३.५ षटकात विजयी केले. तत्पुर्वी, नाणफेक जिंकत दक्षिण अफ्रिकाने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने चुकीचा ठरवला. (क्रीडा प्रतिनिधी)
भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
By admin | Published: February 04, 2017 12:41 AM