India vs Bangladesh SAFF U19: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल स्पर्धेत मोठा गोंधळ झाला. परिस्थिती इतकी विचित्र झाली की सुरुवातीला भारतीय संघ विजेता घोषित झाला होता, पण नंतर विजेता बदलण्याची नामुष्की ओढवली. ढाका येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेश समर्थकांनी भारताला विजेतेपद देण्याच्या निर्णयाविरोधात दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यातून विजेता बदलण्याची वेळ आली.
प्रेक्षकांचा संताप का झाला?
ढाका येथे भारत आणि बांगलादेशच्या अंडर-19 महिला संघादरम्यान फुटबॉलचा अंतिम सामना ११-११ असा बरोबरीत सुटला. सामना संपल्यानंतर पंचांनी टॉस उडवून सामन्याचा निकाल ठरवला. हे घडल्यावर टीम इंडियाने चॅम्पियनशिप जिंकली, पण चाहत्यांना ते आवडले नाही. बांगलादेश संघाकडून पेनल्टी शूट आऊटची मागणी सुरु झाली. पण रेफरींनी तसे केले नाही. त्यामुळे चाहते प्रचंड संतापले. त्यांनी मैदानावर दगडफेक केली आणि मैदानावर बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
बदलावा लागला स्पर्धेचा विजेता
या गदारोळात भारतीय संघ आपला विजय साजरा करत होता; ते मैदानाबाहेर जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना मैदान सोडता आले नाही. भारतीय संघ मैदान सोडण्याचा प्रयत्न करत असताना बांगलादेशचा संघ मैदानातच थांबून निर्णयाचा निषेध करत होता, त्यामुळेच समर्थकही मैदानात त्यांच्यासोबत आले आणि गोंधळ वाढत गेला. प्रदीर्घ वादानंतर फेडरेशनला आपला निर्णय बदलावा लागला आणि शेवटी भारत व बांगलादेश या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे विजेते घोषित झाले, तरीही चॅम्पियन्स ट्रॉफी भारतालाच मिळणार आहे.