भारताचा स्टार फुटबॉलपटूसुनील छेत्री निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. अनेक दिवस मैदानापासून दूर राहिल्यावरही कमबॅकच्या सामन्यात त्याने कमालीचा फिटनेससह हिट शो दाखवून दिला. मालदीव विरुद्धच्या लढतीत सुनील छेत्रीनं एक गोल डागल्याचेही पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वयाच्या चाळीशीत पुन्हा मैदानात उतरलाय छेत्री
सुनील छेत्रीनं मागील वर्षात जूनमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचा मोठा आधार नाहीसा झाला. गोल डागणाऱ्यांची उणीव भासू लागल्यावर वयाच्या चाळीशीतही या गड्यानं पुन्हा भारतीय फुटबॉल संघाकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यात गोल करून त्याने हा निर्णय योग्य असल्याचेही सिद्ध केले आहे.
अखेरच्या काही मिनिटांत दिसला सुनील छेत्रीचा जलवा
मालदीव विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारतीय संघाला पहिला गोल डागण्यासाठी जवळपास अर्धा तास प्रतिक्षा करावी लागली. ३४ व्या मिनिटात राहुल भेकेनं पहिला गोल डागला. या गोलसह भारतीय संघानं आघाडी घेतली. त्यानंतर ६६ व्या मिनिटाला कॉर्नरची संधी गोलमध्ये रुपांतरित करत भारताने दुसरा गोल डागून आघाडी आणखी भक्कम केली. या दोन गोलनंतर सर्वांच्या नजरा या सुनील छेत्रीवर खिळल्या होत्या. तो कमबॅकच्या सामन्यात गोल करणार का? असा प्रश्न अनेक फुटबॉल चाहत्यांना पडला असताना अखेरच्या काही मिनिटांत सुनील छेत्रीनं आपला जलवा दाखवून दिला. भारतीय संघानं हा सामना सहज जिंकला. आता २५ मार्चला भारत-बांगलादेश यांच्यात लढत रंगणार आहे. या सामन्यातही सर्वांच्या नजरा या सुनील छेत्रीवर असतील.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल डागणारे फुटबॉलर
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वलस्थानावर आहे. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत १३५ गोल डागले आहेत. या यादीत ११२ गोलसह लियोनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर असून इराणच्या अली दाई या दिग्गजाच्या खात्यात १०८ गोलची नोंद आहे. सुनील छेत्री हा चौथ्या स्थानावर असून मालदीव विरुद्धच्या गोलसह त्याच्या खात्यात आता ९५ गोलची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर गोल डागण्यासाठी त्याला आता फक्त ५ गोल करायचे आहेत.