ऑनालइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 4 - डकवर्थ लुईसनुसार 41 षटकांमध्ये 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचे सात फलंदाज 136 धावांत तंबूत परतले आहेत. भारताकडून जाडेजा आणि पंड्याने सुरेख आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रत्येकी दोन फंलदाजांना बाद केले. तर क्षेत्ररक्षण करताना जाडेजाने मलिकला धावबाद केले. भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला 12 धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले आहे. बाबर आझामला उमेश यादवने ८ धावांवर बाद केले. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर अजहर अलीने दमदार अर्धशकत करत संघाची धावसंख्या वाढवली. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याला जाडेजाने बाद केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाकिस्तानने 29 षटकात सहा बाद 147 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 70 चेंडूत 138 धावांची गरज आहे.
दरम्यान , एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली. रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा कुटल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबत असलेल्या लढतीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने सावध सुरुवात केली. दरम्यान, दहाव्या षटक सुरू असताना पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारतीय सलामीवीरांनी 9.5 षटकात संघाला बिनबाद 46 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.
पाऊस थांबल्यावर धवन आणि रोहितने फलंदाजीचा गिअऱ बदलला. दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला शंभरीपार नेले. जोरदार फटकेबाजी करणारा शिखर धवन 65 चेंडूत 68 धावा काढून माघारी परतला. शादाब खानने धवनला अझर अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. शिखर धवनने बाद होण्यापूर्वी रोहित शर्मासोबत दमदार 136 धावांची शतकी सलामी दिली.
धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटची मैदानावर जमली. दरम्यान, पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. पाऊस थांबल्यावर दोन षटके कमी करून सामना 48 षटकांचा करण्यात आला. रोहित शर्मा दमदार फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 91 धावांची खेळी केली.
त्यानंतर युवराज आणि कोहलीने तुफान फटकेबाजीस सुरुवात करत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. आज विराट कोहलीपेक्षाही युवराज अधिक आक्रमकपणे खेळत होता. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण करत संघाला तीनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचवले. याचदरम्यान युवराज 53 धावा काढून बाद झाला. अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार ठोकत भारताला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट 81, तर पांड्या 20 धावा काढून नाबाद राहिले.
धावफलकभारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९.गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२).गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.