ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - टी २० विश्वचषक अंतिम टप्यात पोहटला आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी वारू रोखत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज मुंबईच्या वानखेने स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना होणार आहे. यामधून जिंकणारा संघ ३ तारखेला इंग्लडशी दोन हात करणार आहे. सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल. भारतीय आणि वेस्ट इंडिजची फलंदाजी पाहिली तरी ती २ खेळाडूच्या कामगीरीवर अवलंबून असल्याचे या विश्वचषकात दिसले आहे. भारतातर्फे जिगरबाज फलंदाज विराट कोहलीने सर्वोत्म कामगीरी करत भारताला उपांत्य सामन्यात पोहचवले तर विडिंजकडून ही कामगीरी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने केली आहे. त्यामुळे हे दोन फलंदाजापैकी जो सर्वोत्कृष्ट कामगीरी करेल तो संघ अंतिम सामन्यात धडक मारेल हे नक्की.
भारतीय फलंदाजी तगडी आहे. घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. विराट कोहली सोडता एकाही भारतीय फलंदाजाने धावा जमवल्या नाहीत. आजच्या सामन्यात सर्व नजरा मुंबईकर फलंदाज रोहित शर्मो आणि ११ मध्ये जर संधी मिळाली तर रहाणे यांच्यावर असतील. या दोन्ही खेळाडूचे हे होम ग्राउंड आहे.
या उपांत्य सामन्यात भारताला विजयासाठी फेव्हरेट मानण्यात येत असले तरी, वेस्ट इंडिजलाही कमी लेखून चालणार नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी-२०चे चार सामने झाले असून, त्यातील दोन्ही संघांची विजयाची टक्केवारी ५०-५० आहे. भारताने दोन तर, वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकले आहेत.
टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांच्या उपांत्यफेरीचा रेकॉर्ड बघितल्यास भारताने उपांत्यफेरीतील विजयाचा रेकॉर्ड २-० आहे. २००७ मध्ये भारताने पहिल्यांदा डरबनमध्ये उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियावर १५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ढाक्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर सहागडी राखून विजय मिळवला होता.
याउलट वेस्ट इंडिजचा तीन पैकी दोन उपांत्यफेरीत पराभव झाला आहे. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजने अंतिम फेरी गाठली होती. पण २००९ आणि २०१४ च्या उपांत्यफेरीत पराभव झाला होता.
या वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर झालेल्या चार सामन्यामध्ये १७७, १८२, २०९ आणि २२९ धावसंख्या उभारली गेली. त्यातील अफगाणिस्तानचा अपवाद वगळता तीनवेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १७२ धावांपर्यंत मजल मारली होती.
प्रतिस्पर्धी संघ -
भारत ...
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, हरभजनसिंग, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, पवन नेगी, मोहमद शमी.
वेस्ट इंडिज ...
डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मरलॉन सॅम्युएल्स, जेरोम टेलर .