नवी दिल्ली : भारत २०२४मध्ये आॅलिम्पिकचे आयोजन करू शकतो का, ही शक्यता तपासण्यासाठी केंद्र शासन आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांना आमंत्रित केले आहे.देशात क्रीडा विकास तसेच आॅलिम्पिकची संभाव्य दावेदारी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बाक यांची चर्चा होणार आहे. २०१३मध्ये आयओसी प्रमुख बनलेले बाक हे येत्या २७ एप्रिल रोजी भारतात येतील. बाक यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. जर्मनीसाठी तलवारबाजी या खेळात आॅलिम्पिक खेळलेले बाक यांना स्वित्झर्लंडमधील लुसाने येथील आयओसीच्या मुख्यालयात क्रीडा सचिव अजित शरण आणि आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी भारत भेटीचे आमंत्रण दिले. बाक हे या संदर्भात आयओसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आजच चर्चा करणार आहेत. आम्ही २०२४च्या आॅलिम्पिक आयोजनाला इच्छुक आहोत; पण सध्या तरी कुठलीही औपचारिक माहिती उघड करणार नाही, असे आयओएच्या सूत्रांनी स्पष्ट केले. बाक हे भारतात आॅलिम्पिक विकासाबाबत उत्सुक आहेत. येत्या काही वर्षांत आॅलिम्पिक मोहीम राबविण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे बाक यांचे मत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी हे या महिन्यात बाक यांच्याशी दिल्लीत चर्चा करतील, या वृत्तास रामचंद्रन यांनी दुजोरा दिला; पण २०२४च्या आॅलिम्पिक दावेदारीसंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया मात्र दिली नाही. ते म्हणाले, ‘‘भारतीय क्रीडाविकासावर चर्चा करण्यासाठी मोदी यांनी डॉ. बाक यांना या महिन्यात आमंत्रित केले आहे. तारखेचा निर्णय मात्र आयओसी आणि पंतप्रधान कार्यालय घेणार आहेत. दोन्ही व्यक्ती अतिविशिष्ट असल्यामुळे दोघांच्या कार्यालयांमार्फत ही तारीख निश्चित केली जाईल.’’२०१६चे आॅलिम्पिक ब्राझीलच्या रियो दि जानिरो शहरात होत आहे. जपानची राजधानी टोकियो येथे २०२०चे आॅलिम्पिक होणार आहे. २०२४साठी इच्छुक शहरांनी सरकारचे अर्ज तसेच गॅरंटी पत्रे आयओसीकडे सप्टेंबरपर्यंत सोपवायची आहेत. कार्यसमिती अर्जांची छाननी केल्यानंतर आयओसीच्या कार्यकारी बोर्डापुढे ठेवेल तसेच पुढील मेमध्ये चढाओढीत असलेल्या शहरांची औपचारिक घोषणा केली जाईल. त्यानंतर १५ सप्टेंबर २०१७ ला पेरूतील लिमा शहरात आयओसीच्या १३०व्या अधिवेशनादरम्यान यजमान सत्रासाठी मतदान होणार आहे. (वृत्तसंस्था)