‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही पूर्ण क्षमतेने खेळू अशी आशा आहे,’’ असे मत भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांनी मांडले. त्याचवेळी त्यांनी संघातील इतर खेळाडूंनीही पूर्ण क्षमतेने खेळ करण्याची गरज असल्याचे सांगितले.वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांतय सामन्याच्या पूर्वसंध्येला शास्त्री यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘अजूनपर्यंत संघाची क्षमतेनुसार पूर्ण कामगिरी झालेली नाही. सर्वच प्रमुख खेळाडू आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले असले तरी, उपांत्य लढतीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना नक्कीच स्वत:ला सिद्ध करतील.’’ त्याचबरोबर, ‘‘उपांत्य फेरीच्या या निर्णायक लढतीत संघाचा सर्वोत्तम खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही केवळ एखाद - दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी ६ - ७ खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची संघाला आवश्यकता आहे. स्पर्धेत आतापर्यंत असे झाले नसले, तरी उपांत्य लढतीत असा खेळ होण्याची शक्यता आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.
उपांत्य लढतीत भारतीय पूर्ण क्षमतेने लढतील : शास्त्री
By admin | Published: March 31, 2016 3:11 AM