मीरपूर : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचा भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही, असा विश्वास इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला. बेलिस म्हणाले,‘भारत दौरा खडतर राहणार आहे, हे निश्चित. आम्हाला या दौऱ्यात चांगली कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही आम्ही पिछाडीवर असताना शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो आहोत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध त्यांच्याच भूमीत खेळायचे असल्यामुळे आम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. यापूर्वीही इंग्लंड संघाने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन केले आहे. त्यामुळे या वेळी संघाकडून अशीच अपेक्षा आहे.’इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मालिका १-१ ने बरोबरीत संपली. इंग्लंडने यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या सर्व ९ कसोटी सामन्यांत विजय मिळविण्याची कामगिरी केली आहे; पण भारत दौऱ्यापूर्वी पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही प्रशिक्षक बेलिस यांनी संघ शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. बेलिस म्हणाले, ‘संघातील काही खेळाडूंचे स्थान धोक्यात आहे. त्यात गॅरी बॅलेन्सचाही समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध चार डावांत त्याला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. पाकविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बॅलेन्सची सरासरी ३० पेक्षा कमी होती, तरी त्याची बांगलादेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली; पण तेथेही त्याला छाप सोडता आली नाही.’ (वृत्तसंस्था)
भारत दौऱ्यावर प्रभाव पडणार नाही
By admin | Published: November 02, 2016 7:14 AM