नवी दिल्ली : आगामी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये गतविजेत्या भारताने सहभाग घ्यावा, अशी इच्छा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे. एका क्रिकेट संकेस्थळाने दिलेल्या माहितीनुसार तेंडुलकर, द्रविड यांचा अशा १२ माजी क्रिकेटपटूंमध्ये समावेश आहे, ज्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने खेळावे असे मत आहे.या संकेस्थळाने म्हटले आहे की, ‘तेंडुलकर, द्रविडसह झहीर खान, गुंडप्पा विश्वनाथ, संदीप पाटील, संजय मांजरेकर, आकाश चोप्रा, अजित आगरकर, व्यंकटेश प्रसाद, साबा करीम, मुरली कार्तिक आणि दीप दासगुप्ता या सर्वांचे मत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी, असेच मत आहे.’ भारताने २०१३ मध्ये जिंकलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत असेही या क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. आयसीसीने जाहीर केलेले नवे आर्थिक मॉडेल अमान्य असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा गांभिर्याने विचार करीत आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या आयोजकांच्या समितीने मात्र कोणताही निर्णय आमच्या मान्यतेशिवाय बीसीसीआय घेऊ शकत नाही असे स्पष्ट करत बीसीसीआयची कोंडी केली आहे. (वृत्तसंस्था)
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळावी
By admin | Published: May 05, 2017 1:03 AM