इपोह : जपानमध्ये बुधवारपासून सुरू होत असलेल्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघ आगामी रिओ आॅलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून उतरेल. आठ वेळा आॅलिम्पिक सुवर्णपदकावर कब्जा केलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीवर या वेळी विशेष लक्ष असेल.या स्पर्धेद्वारे भारताला जागतिक विजेत्या आॅस्टे्रलियासारख्या इतर बलाढ्य संघांविरुद्ध स्वत:ला अजमावण्याची संधी मिळेल. चार महिन्यांनी आॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असल्याने भारतीय संघ अझलन शाह स्पर्धेत चमकदार कामगिरीसह स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. गतवर्षी डिसेंबर महिन्यात रायपूरला झालेल्या हॉकी विश्व लीग स्पर्धेत भारताला कांस्य पटकावण्यात यश आले होते. तसेच अझलन शाह स्पर्धेतून युवा खेळाडूंच्या क्षमतेचा कस भारतीय संघ अजमावेल. भारताने कोर ग्रुपमध्ये बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळेच प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेंसही या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील. ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी कठीण परीक्षा असेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारताचे नेतृत्व सरदार सिंगकडे सोपविण्यात आले असून, एस. व्ही. सुनील, रुपिंदरपाल सिंग, कोथाजित सिंग आणि मनप्रीत सिंग यांच्यावरही संघाची मदार आहे.स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास आॅस्टे्रलियाचे वर्चस्व दिसून येईल. आॅसी संघाने सर्वाधिक ८ वेळा स्पर्धेचे विजेतेपद उंचावले आहे, तर भारताने त्यानंतर ५ वेळा बाजी मारत आपला दबदबा राखला आहे. याआधी २०११ साली भारताने आपले शेवटचे जेतेपद पटकावले होते. त्या वेळी अंतिम सामन्यात झालेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे भारत व दक्षिण कोरिया संयुक्त विजेते ठरले होते. (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिक तयारीसाठी भारतीय संघ खेळणार
By admin | Published: April 06, 2016 4:38 AM