मुंबई : अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यंदा भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्की गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केला आहे. हार्दिक पंड्या आणि पवन नेगी यांच्यासारखे फलंदाज आठव्या व नवव्या स्थानावर चांगली फलंदाजी करू शकतात. याशिवाय सहा किंवा सात गोलंदाजदेखील आहेत. आशिष नेहरा चांगली गोलंदाजी करीत असून, बुमराह देखील डेथ ओव्हरमध्ये प्रभावी ठरतो. एकूणच संघ बलाढ्य असून, संघाची अष्टपैलू कामगिरी विश्वचषकात चॅम्पियन बनण्यास कारणीभूत ठरेल, असे द्रविडचे मत आहे. वन डे आणि टी-२० सामन्यात देखणी कामगिरी केल्याचे बक्षीस भारतीय संघाला रँकिंगच्या रूपाने मिळाले आहे. कसोटीतही भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. आता विदेश दौऱ्यात यश मिळविण्याचे आव्हान असेल. लंकेत विजय मिळाल्याने भारतीय संघात उत्साहाचा संचार झाला असून, आता भारतीय उपखंडाबाहेरदेखील असेच यश मिळेल, अशी आशा आहे.विश्वचषकाचे अन्य दावेदार कोण, असा सवाल करताच राहुल द्रविडने आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेचा उल्लेख केला. या दोन्ही संघांत चांगले मॅचविनर असल्याचे द्रविडचे मत होते. आॅस्ट्रेलिया संघात अखेरपर्यंत झुंजण्याची क्षमता आहे. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये असल्याने भारतात खेळण्याचा या खेळाडूंना मोठा अनुभव आहे. येथील परिस्थितीशी हे खेळाडू एकरूप झाले आहेत. द. आफ्रिकेकडेही एबी डिव्हिलियर्स, क्वींटन डिकॉक आणि हशिम आमला यांचा समावेश असल्याने हा संघदेखील धोकादायक वाटतो; पण द. आफ्रिका मोक्याच्या क्षणी ढेपाळत असल्याने या संघाचे काही खरे नाही, असेही द्रविडने नमूद केले. (वृत्तसंस्था) भारत या स्पर्धेत सर्वांत बलाढ्य संघ असल्याने जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे.’ भारतीय संघ आघाडीच्या चार संघांत स्थान नक्की पटकावेल; पण उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यात कुठला संघ कशी कामगिरी करतो, यावर चॅम्पियन ठरणार आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू असून, पुढील २४ महिन्यांत रोमहर्षक क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या भारतीय संघात तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरणारे खेळाडू आहेत, ही चांगली बाब म्हणावी लागेल. - राहुल द्रविड
भारत उपांत्यफेरी गाठेल : द्रविड
By admin | Published: March 13, 2016 4:17 AM