हैदराबाद : सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होत असलेल्या एकमेव कसोटीत कमकुवत बांगलादेशविरुद्ध विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. नंबर-१ भारत विरुद्ध नवव्या स्थानावर असलेला बांगलादेश यांच्यातील हा सामना म्हणजे ‘ससा-कासवातील लढत’ मानली जात आहे.
दोन्ही संघांच्या रँकिंगवर नजर टाकल्यास परस्परांची तुलना होऊ शकत नाही. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. भारतभूमीत प्रथमच कसोटी खेळणाऱ्या बांगलादेशसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरेल. दुसरीकडे न्यूझीलंड आणि इंग्लंडला पाणी पाजणाऱ्या भारतासाठी विजयी घोडदौड कायम राखणे अनिवार्य असेल. वन-डे क्रिकेटमध्ये ‘अपसेट’ घडविणाऱ्या बांगला संघाला कसोटीत मात्र चमत्कार करता आला नाही. मागील महिन्यात ५५० धावा उभारल्यानंतरही न्यूझीलंडकडून हा संघ पराभूत झाला. कसोटीचा दर्जा मिळून १६ वर्षे झाली तरीही या संघाला विजयी फॉर्म्युला शोधता आला नाही, हे यातून निष्पन्न झाले. भारत-बांगलादेश यांच्यात फातुल्ला येथे झालेला कसोटी सामना पावसात वाहून गेला. पावसाने बांगलादेशला पराभवापासून वाचविले होते. सध्या मुस्तफिजूर रहमानसारखा वेगवान गोलंदाज या संघात नाही. आयपीएलमध्ये सनरायझर्सचा सदस्य असल्याने तो हैदराबादच्या उपल मैदानाशी परिचित आहे.
अंतिम ११ जणांत कुणाला खेळवायचे, ही भारतापुढील डोकेदुखी आहे. लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार कोहली हे पहिल्या चार स्थानांसाठी कायम आहेत. चौथ्या स्थानासाठी अभिनव मुकुंदचा विचार होतो का, हे पाहावे लागेल. त्रिशतकवीर करुण नायर दावेदार असला तरी अजिंक्य रहाणे हा मोठा अडथळा आहे. रहाणे खेळला आणि नायर बाहेर बसणार असेल तर भारताकडे प्रमुख पाच गोलंदाज असतील. याशिवाय रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज राहतील. मागच्या सामन्यात बांगलादेशचा एकही फलंदाज आश्विनच्या माऱ्यापुढे स्थिरावू शकला नव्हता. खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांना लाभ होऊ शकतो.
यष्टिरक्षणाची धुरा पार्थिव पटेलऐवजी वृद्धिमान साहाकडे असेल. फिरकी गोलंदाज अमित मिश्रा जखमी होताच बाहेर पडला. त्याची जागा कुलदीप यादवने घेतली. पण कसोटी पदार्पणासाठी त्याला प्रतीक्षा करावी लागेल. बांगलादेशची भिस्त फिरकीपटू शाकिब-अल-हसन आणि युवा गोलंदाज मिराज यांच्यावर असेल.२०००-१५ दरम्यान या दोन्ही संघांमध्ये ८ कसोटी सामने झाले आहेत. यातील ६ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर २ सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध २००७ मध्ये ढाका येथे ३ बाद ६१० (घोषित) धावांपर्यंत मजल मारली होती.बांगलादेश संघाने भारताविरुद्ध २००० मध्ये ढाका येथे ४०० धावा केल्या होत्या.उभय संघ असेभारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींंद्र जडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, अभिनव मुकुंद आणि कुलदीप यादव.बांगलादेश : मुशफिकर रहीम (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, महमुदुल्लाह रियाद, मोमिनुल हक, शब्बीर रहमान, शाकिब-अल-हसन, लिटोन दास, तस्कीन अहमद, मेहदी हसन मिराज, मुसद्देक हुसेन, कामरुल इस्लाम रब्बी, शुभाशीष राय, तैजुल इस्लाम, शफीउल इस्लाम.रहाणेचे परिश्रम नजरेआड करण्यासारखे नाहीत : कोहलीकरुण नायरचे ऐतिहासिक त्रिशतक उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांच्या कठोर मेहनतीला पर्याय ठरू शकत नाही, असे सांगून कर्णधार विराट कोहली याने अजिंक्य हा तंदुरुस्त होऊन अंतिम एकादशमध्ये स्थान मिळविणार असल्याचे संकेत दिले. इंग्लंडविरुद्ध रहाणेला यश आले नाही. हाताला मार लागल्याने मालिकेबाहेर पडावे लागले होते. पण बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीत तो खेळणार हे निश्चित. तो पाचव्या स्थानावर फलंदाजीला येईल, असे सांगून विराट म्हणाला, ‘एका सामन्यातील यश हे अन्य खेळाडूच्या दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकत नाही. मागच्या दोन वर्षांत रहाणेने संघासाठी काय केले, हे सर्वांना माहीत आहे. रहाणेच्या अनुपस्थितीत करुण संघात आला. त्याने झकास कामगिरी केली; पण अजिंक्यची कामगिरी तुम्ही नजरेआड करू शकणार नाही. कमकुवत म्हणू नका, संधी तर द्या : मुशफिकरकसोटीत कमकुवत असल्याचा ठपका बांगलादेशवर नेहमीच ठेवला जातो. पण संधी देण्याऐवजी असे नेहमी म्हणत असाल तर ही टीका मान्य नाही. खेळण्याची संधी तर द्या, असे बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने म्हटले आहे. कसोटीच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, ‘‘मी ११ वर्षांपासून खेळत आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बांगलादेशला बाहेर कसोटी सामना खेळण्याचा योग आला. इतर संघ संधी देणार नसतील आणि कमकुवत म्हणून हिणवत असतील तर टीका मान्य नाही. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात बरेच काही शिकायला मिळते. खेळण्याची संधी मिळणार असेल तरच नवे शिकू शकू. तुम्ही संधीच देत नसाल तर आम्ही कमकुवत आहोत किंवा बलाढ्य आहोत हे कसे कळेल.’’