लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे यजमानपद भूषवित असलेला भारतीय संघ १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात अमेरिकेविरुध्द भिडेल. सहा आॅक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या फुटबॉल वॉरमधील पहिला सामना नवी दिल्ली येथील नेहरु स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल.यजमान असल्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेच्या ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. मुंबईत शुक्रवारी रात्री स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. यानुसार भारताला अमेरिकेशिवाय घाना आणि कोलंबियाविरुद्धही दोन हात करावे लागणार आहे. भारताचे सर्व गटसाखळी सामने दिल्लीमध्ये खेळविण्यात येणार आहेत. ६ आॅक्टोबरला अमेरिकेविरुध्द सलामीचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ९ आॅक्टोबरला कोलंबिया आणि १२ आॅक्टोबरला घानाविरुद्ध खेळेल. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले की, ‘ या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भारत पुर्णपणे सज्ज आहे. आम्ही आमच्या शानदार पाहुणचारामध्ये यशस्वी ठरु अशी आशा आहे.’ त्याचवेळी, ‘या स्पर्धेचे यजमानपद भूषविताना आम्ही सर्वश्रेष्ठ पाहुणचार करु,’ असा विश्वास भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याने व्यक्त केला. १‘अ’ गटामध्ये भारताला घानाकडून तगडे आव्हान मिळेल. घानाने १९९१ आणि १९९५ अशी दोन वर्ष १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बाजी मारली आहे. घानाने आठवेळा या स्पर्धेत सहभाग घेतला असून २००७ सालानंतर ते पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळतील.२अमेरिका या स्पर्धेतील सर्वात अनुभवी संघ आहे. आतापर्यंत १५ वेळा १७ वर्षांखालील स्पर्धेत सहभागी झालेल्या अमेरिकेने १९९९ मध्य चौथे स्थान पटकावले होते. ही अमेरिकेची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच, कोलंबिया सहाव्यांदा या स्पर्धेत खेळणार असून त्यांनी २००३ व २००९ साली चौथे स्थान पटकावले होते. ३यंदाच्या स्पर्धेचे विशेष म्हणजे, यावर्षी यजमान भारतासह एकूण तीन संघ पहिल्यांदाच १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. यामध्ये भारतासह न्यू कॅलेडोनिया आणि नायजर यांचा समावेश आहे. तसेच, २४ देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा सहा गटात विभागली असून प्रत्येक गटात ४ संघांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेची गटवारी‘अ’ गट : भारत, अमेरिका, कोलंबिया आणि घाना.‘ब’ गट : पॅराग्वे, माली, न्यूझीलंड आणि टर्की‘क’ गट : इराण, गिनी, जर्मनी आणि कोस्टा रिका.‘ड’ गट : उत्तर कोरिया, नायजर, ब्राझील आणि स्पेन.‘इ’ गट : होंडुरास, जपान, न्यू कॅलेडोनिया आणि फ्रान्स.‘फ’ गट : इराक, मेक्सिको, चिली आणि इंग्लंड.येणाऱ्या भविष्य काळामध्ये लवकरच भारत फिफा विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळवेल, अशी आमची आशा आहे. आम्हाला पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल मी फिफाचे खूप आभार मानतो. - खा. प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, अ. भा. फुटबॉल महासंघ
भारत सलामीला भिडणार अमेरिकेशी
By admin | Published: July 08, 2017 1:27 AM