मिरपूर : शमर स्प्रिंगरच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर वेस्ट इंडीजने गुरुवारी रोमहर्षक लढतीत बांगलादेशाला तीन गड्यांनी पराभूत करून १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. निर्णायक लढत १४ फेब्रुवारी रोजी तीन वेळेचा चॅम्पियन भारताविरुद्ध होणार आहे.विंडीजपुढे विजयासाठी २२७ धावांचे लक्ष्य होते. स्प्रिंगरने ८८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावा ठोकल्या. कर्णधार शिमरान हेटमेयर याने ६० तसेच सलामीवीर गिडरोन पोप याने ३८ धावांचे योगदान दिले. विंडीजने ४८.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा करून दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. त्याआधी बांगलादेशाने ५० षटकांत सर्व बाद २२६ धावा केल्या. कर्णधार मेहदी हसन मिराज ६०, मोहंमद सैफुद्दीन ३६ आणि जोएराज शेख याने ३५ धावा केल्या. विंडीजकडून किमोपॉल याने २० धावांत ३ व स्प्रिंगर तसेच शेमार होल्डर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विंडीजने चांगली सुरुवात केली; पण नियमित फरकाने फलंदाज बाद होत गेल्यामुळे लक्ष्य गाठणे कठीण झाले होते. स्प्रिंगरने एक टोक सांभाळून विंडीजला विजय मिळवून दिला.भारताने पहिल्या उपांत्य सामन्यात लंकेचा ९७ धावांनी पराभव करून चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. भारत-विंडीज संघ कुठल्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १९८३नंतर प्रथमच परस्परांपुढे येणार आहेत. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने त्या वेळी वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्लाईव्ह लॉईडच्या संघावर लॉडर््स येथे ४३ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदविला होता. १९ वर्षांखालील गटात भारत-विंडीजदरम्यान आतापर्यंत ९ सामने खेळले गेले. त्यांतील ७ सामने भारताने जिंकले आहेत. विंडीजला २ सामन्यांत विजय मिळाला.
भारत-विंडीज अंतिम सामना
By admin | Published: February 12, 2016 12:50 AM