नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पकआधी रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने रविवारी येथे संपलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात १५ सुवर्णांसह सर्वधिक ३० पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजविले. आधी मिळविलेल्या १५ ऑलिम्पिक कोट्यात मात्र भारतीय नेमबाजांना भर घालता आली नाही.
भारताने जिंकलेल्या एकूण पदकांमध्ये नऊ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचादेखील समावेश आहे. आज अखेरच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू केनान चेनाई, पृथ्वीराज टोंडाईमान आणि लक्ष्य शेरॉन यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात तसेच श्रेयसी सिंह, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदके जिंकली.
भारताच्या दोन्ही संघांनी कझाखस्तानचा सहज पराभव केला. त्याआधी, विजयवीर सिद्धू, गुरुप्रीतसिंग आणि आदर्शसिंग यांना पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर सांघिक स्पर्धेत कामगिरी करण्यात अपयश आल्याने या त्रिकुटाला रौप्यवर समाधान मानावे लागले.
‘ स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत आमचे नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा १६ वा कोटा मिळवतील, अशी अपेक्षा होती. विजयवीर सध्या युवा आहे. त्याने सुरेख कामगिरी केली. पुढे तो आणखी प्रभावी कामगिरी करेल. खेळाडूंचे मनोबळ उंचावलेले असून, मी कामगिरीवर समाधानी आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिम्पिकशी तुलना होणारी नाही. तरीही मानसिकरीत्या आम्हाला लाभ होईल, यात शंका नाही.’ - रानिंदरसिंग, अध्यक्ष, राष्ट्रीय रायफल संघ.