पोटचेफ्सट्रूम : अनुभवी झुल्लन गोस्वामीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेली सुरेख कामगिरी आणि जबरदस्त सूर गवसलेल्या पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा १०२ चेंडू आणि आठ गडी राखून धुव्वा उडवताना चार देशांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका जिंकली.महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या झुल्लन हिने २२ धावांत ३ बळी घेतले. लेगस्पिनर पूनम यादवने ३२ धावांत ३ व मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने २३ धावांत २ गडी बाद करीत तिला साथ दिली. या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४०.२ षटकांत १५६ धावांत गारद केले. दक्षिण आफ्रिकेकडून सून लुस हिने सर्वाधिक ५५ आणि मिगोन डू प्रीजने ३० धावा केल्या.भारतीय संघाने आवाक्यात असणाऱ्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना दीप्ती शर्मा (८) आणि मोना मेशराम (२) यांची विकेट प्रारंभीच गमावली; परंतु सलामीवीर पूनम राऊतने ९२ चेंडूंत नाबाद ७० आणि मिताली राज हिने ७९ चेंडूंत नाबाद ६२ धावा करीत आणि तिसऱ्या गड्यासाठी नाबाद १२७ धावांची भागीदारी करीत संघाला ३३ षटकांत २ बाद १६० धावांपर्यंत मजल मारू देताना शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.भारताकडून १०० व्या वन-डे सामन्यात नेतृत्व करणाऱ्या मितालीने तिच्या खेळीत १० चौकार मारले. पूनमने तिच्या खेळीत १२ चौकार व एक षटकार मारला. मितालीने वन-डेत सलग सहावे अर्धशतक ठोकताना आॅस्ट्रेलियाच्या एलिस पॅरी आणि लिंडसे रीलर, तसेच इंग्लंडच्या चार्लोट एडवर्डस् यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मितालीने या स्पर्धेदरम्यान वनडेत ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमदेखील केला होता. ती एडवर्डस्नंतर अशी कामगिरी करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर आहे.मितालीचे कर्णधारपदाचे शतकस्टार फलंदाज मिताली राज रविवारी महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १00 सामन्यांत नेतृत्व करणारी पहिली भारतीय आणि जगातील तिसरी क्रिकेटर बनली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौरंगी एकदिवसीय मालिकेतील फायनल खेळताना ही उपलब्धी मिळवली. मितालीने १९९९ मध्ये महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते; परंतु तिने प्रथमच २00४ मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते.संक्षिप्त धावफलकदक्षिण आफ्रिका : ४0.२ षटकांत सर्व बाद १५६. (सून लुस ५५, डू प्रीज ३0. झुलन गोस्वामी ३/२२, पूनम राऊत ३/२३, शिखा पांडे २/२३). पराभूत वि. भारत : ३३ षटकांत २ बाद १६0. (पूनम राऊत नाबाद ७0, मिताली राज नाबाद ६२).
भारतीय संघाने जिंकली चौरंगी मालिका
By admin | Published: May 22, 2017 2:39 AM