ग्लास्गो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठय़ा अपेक्षेने उतरलेल्या भारतीय बॅडमिंटन संघाने आज गुरुवारी मिश्र सांघिक स्पर्धेत ‘ब’ गटात विजयी सुरुवात करताना घानाला 5-0 असे एकतर्फी हरविले.
भारताच्या के. श्रीकांत आणि तुलसी पी. सी. या जोडीने घानाच्या डॅनिएल सॅम आणि स्टेला अमास्हा जोडीला 17 मिनिटांत 21-5 आणि 21-9 असे पराभूत केले. तत्पूर्वी, पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात पी. कश्यपने डी. सॅमचे आव्हान 27 मिनिटांत मोडून काढत त्याला 21-6, 21-16 असे पराभूत केले. या विजयाने भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. महिला एकेरीच्या दुस:या सामन्यात वेंकटाने भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. तिने स्टेलाला 21-7, 21-5 असे केवळ 15 मिनिटांत हरविले. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारतीय जोडी अक्षय देवाळकर आणि प्रणव चोपडा यांनीही भारताची घोडदौड पुढे सुरूच ठेवली. त्यांनी एमानुल डोनकार आणि अब्राहम आयटी जोडीला 21-7, 21-11 असे हरविले. महिला दुहेरीत भारताची जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी आपला सामना केवळ 17 मिनिटांत जिंकून भारताची आघाडी 4-0 ने वाढविली. दोघींनी डायना आर्चर आणि एवेलिन बोत्वे जोडीला 21-4, 21-10 असे हरविले. या जोडीने पहिला गेम सात, तर दुसरा गेम केवळ 8 मिनिटांत जिंकला.