रांची : भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलानी मनोदराने २७, तर कर्णधार शशिकला सिरिवर्धनेने २६ धावांची खेळी केली.भारताकडून एकता बिष्टने २२ धावांत आणि पूनम यादवने १७ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने विजयी लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले. भारताकडून कर्णधार मिताली राजने ५२ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. तिला अनुजा पाटीलच्या रूपाने चांगली साथ मिळाली. या दोघींनी सहाव्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी केली. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने ३३ चेंडूंत ३४ धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने चार षटकांत १० धावा देत ३ गडी बाद केले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकात ८ बाद १०७. (दिलानी मनोदरा २७, शशिकला सिरिवर्धने २६. एकता बिष्ट ३/२२, पूनम यादव ३/१७); भारत : १९ षटकांत ५ बाद १०८. (मिताली राज नाबाद ५१, अनुजा पाटील ३४, इनोका रणवीरा ३/१०).
श्रीलंकेला धूळ चारत भारताने मालिका जिंकली
By admin | Published: February 25, 2016 3:55 AM