ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. १ - कर्णधार अँजलो मॅथ्यूजने (११०) जोरदार लढत दिल्यानंतरही भारताने तिस-या कसोटीत श्रीलंकेला ११७ धावांनी नमवून तब्बल २२ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी मालिका (२-१) जिंकली आहे. आर. अश्विनने दुस-या डावात ४ बळी टिपत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले आणि तिसरी कसोटी जिंकत मालिका खिशात टाकली.
भारताच्या ३८६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सर्व गडी २६८ धावांत बाद झाले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशातील प्रथम मालिका विजय नोंदवला आहे. पहिल्या डावात पुजाराची १४५ धावांची शानदार खेळी, इशांत शर्माने कसोटीत टिपलेले २०० बळी आणि श्रीलंकेचा कर्णधार अँजलो मॅथ्यूचे (११०) शतक यामुळे ही तिसरी कसोटी यादगार ठरली. 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार चेतेश्वर पुजाराला तर या मालिकेत एकूण २१ बळी टिपणा-या आर. अश्विनला 'मॅन ऑफ दि सीरिज'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना श्रीलंकेची अवस्था ३ बाद ६७ अशी होती, त्यानंतर त्यांनी २ गडी पटापट गमावले आणि त्यांची स्थिती ५ बाद १०७ अशी झाली. मात्र त्यानंतर आलेला श्रीलंकेचा कर्णधार अँजलो मॅथ्यूज याने ११० धावांची शानदार खेळी केल्याने श्रीलंकेने २०० धावांचा टप्पा सहज पार केला. त्यामुळे भारत हा सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आर.अश्विन ( ६९ धावांत ४ बळी) व इशांत शर्माने (३२ धावांत ३ बळी) चांगली गोलंदाजी केल्याने २४२ धावांवर परेराच्या रुपाने श्रीलंकेची सहावी विकेट पडली. त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज एकामागोमाग एक असे तंबूत परतले आणि त्यांचा डाव २६८ धावांत संपुष्टात आला.