ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 26 - रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा करणा-या भारताला ऑलिम्पिकपूर्वी अजून एक धक्का मिळाला आहे. गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याची माहिती मिळाली आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने अगोदरच वाद निर्माण झाला असताना आता अजून एक खेळाडू उत्तेजक चाचणीत बाद झाल्याने भारतासमोरील समस्या वाढण्याची शक्यता आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे 22 जूनला इंद्रजित सिंहला बंदी असलेल्या स्टेराईडचा वापर करताना पकडण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने अॅथलेटिक्स फेडरेशनला पत्र पाठवून गोळाफेकपटू इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याची माहिती दिली आहे.
एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणा-या इंद्रजित सिंह रिओ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता. इंद्रजित सिंहकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून जास्तीत जास्त खेळाडू पाठवण्यात येणार आहेत. मात्र नरसिंग यादव आणि त्यानंतर आता इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याने जागतिक स्तरावर डोपिंगची पाहणी करणा-यांसमोर भारतीय खेळाडूंसंबंधी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) चाचणी करुन घेण्यास इंद्रजित सिंहने नकार दिला होता. 'जेव्हा त्याने आमच्याकडून चाचणी करुन घेण्यास नकार दिला तेव्हा आम्हाला शंका आली होती. आमची भीती खरी ठरल्याची', प्रतिक्रिया नाडाने दिल्याचं सुत्रांकडून समजलं आहे.