बॅँकॉक : अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत. भारतीय तिरंदाजी संघटेनच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली खेळत आहेत.दासने पुरुष रिकर्व्ह वैयक्तिक प्रकरात कांस्य जिंकले. त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहला ६-५ असे पराभूत केले. सोमवारी मिश्र रिकर्व्ह प्रकरात दिपिका कुमारीसह त्याने कांस्य मिळवले. त्यानंतर पुरुष रिकर्व्ह संघासमवेतही कांस्य पटकावत दासने हॅट्ट्रिक पूर्ण केली. दासने वरिष्ठ खेळाडू तरुणदीप राय व जयंत तालुकदार याच्यासमवेत चीनला ६-२ ने पराभूत केले.दीपिका कुमारी, लेशराम बोम्बायला देवी व अंकिता भक्त यांनी जपानला ५-१ असे पराभूत करत रिकर्व्ह कांस्यपदक जिंकले. भारताचे तीन तिरंदाज कंपाऊंड प्रकारात अंतिम सामन्यात पोहोचले.अभिषेक वर्मा, रजत चौहान व मोहन भारद्वाज यांनी इराणला २२९ -२२१ असे नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना कोरियाशी होईल. ज्योति सुरेखा वेनाम, मुस्कान किरार व प्रिया गुर्जर यांनीही इराणला २२७-२२१ पराभूत करत अंतिम फेरी गाठली. महिला संघालाही अंतिम फेरीत कोरियाशी खेळावे लागेल. त्याचबरोबर कंपाऊंड मिश्र प्रकरात वर्मा व ज्योती यापुर्वीच अंतिम फरीत पोहचले आहेत.
भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:28 AM