nishad kumar high jump । पॅरिस : भारताच्या निषाद कुमारने पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली आहे. उंच उडी टी-४७ स्पर्धेत निषादने ही कामगिरी केली. यासह या स्पर्धेत पदक जिंकणारा निषाद हा दुसरा खेळाडू ठरला आहे. खरं तर पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये पहिली चार पदक जिंकणाऱ्या शिलेदारांना २०२४ पॅरालिम्पिक गेम्समधील सर्व वैयक्तिक पदक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, निषादने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात २.०९ मीटर उंडी घेत रौप्य पदकावर नाव कोरले. तर अमेरिकेच्या खेळाडूने सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्य पदक जिंकणाऱ्या निषादने २.०७ मीटर उडी मारण्याचा यशस्वी प्रयत्न केल्यानंतर तो पाचव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानावर होता. त्याने अंतिम प्रयत्नात अप्रतिम झेप घेऊन रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केला. हिमाचल प्रदेशच्या या निषादने २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकले होते.