बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा दिवसेंदिवस रंगत ठरत चालली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी (रविवारी) भारतीय खेळाडूंनी तब्बल १५ पदके जिंकून स्पर्धेत पदकांचे अर्धशतक ठोकले. दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवून एकूण १५ पदक पटकावली, ज्यामध्ये ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदक निश्चित केले आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा शूट-आऊट सामन्यात पराभव करून विक्रमी कांस्य पदक जिंकले आहे. तब्बल १६ वर्षांनंतर भारतीय महिलांना हॉकीमध्ये पदक जिंकण्यात यश आले. मात्र भारतीय महिला क्रिकेट संघाला आपल्या फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. कांगारूच्या संघाने सुवर्ण कामगिरी केल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारताच्या खात्यात १८ सुवर्ण राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर स्थित आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७४ पदक जिंकून पहिले स्थान पटकावले आहे. तर यजमान इंग्लंड १६६ पदकांसह दुसऱ्या आणि कॅनडा ९१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. न्यूझीलंडने एकूण ४८ पदके जिंकली आहेत मात्र त्यांनी भारतापेक्षा एक सुवर्ण जास्त जिंकल्याने ते यादीत भारतापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. भारताने आतापर्यंत १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदके जिंकली आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पदक विजेते भारतीय खेळाडू
- संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- गुरूराजा पुजारी - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
- मीराबाई चानू - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
- बिंद्यारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
- अचिंता शेऊली - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ७३ किलो)
- सुशीला देवी - रौप्य पदक (ज्युडो ४८ किलो)
- विजय कुमार यादव - कांस्य पदक (ज्युडो ६० किलो)
- हरजिंदर कौर - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१ किलो)
- महिला संघ - सुवर्ण पदक (लॉन बॉल्स)
- पुरूष संघ - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
- विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
- मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक
- लवप्रीत सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो)
- सौरव घोषाल - कांस्य पदक (स्क्वॉश)
- तुलिका मान - रौप्य पदक (ज्युडो)
- गुरदीप सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ + किलो)
- तेजस्विन शंकर - कांस्य पदक (उंच उडी)
- मुरली श्रीशंकर - रौप्य पदक (लांब उडी)
- सुधीर - सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
- अंशु मलिक - रौप्य पदक (कुस्ती ५७ किलो)
- बजरंग पुनिया - सुवर्ण पदक (कुस्ती ६५ किलो)
- साक्षी मलिक - सुवर्ण पदक (कुस्ती ६२ किलो)
- दीपक पुनिया - सुवर्ण पदक (कुस्ती ८६ किलो)
- दिव्या काकरान - कांस्य पदक (कुस्ती ६८ किलो)
- मोहित ग्रेव्हाल - कांस्य पदक (कुस्ती १२५ किलो)
- प्रियंका गोस्वामी - रौप्य पदक (१० किमी चालणे)
- अविनाश साबळे - रौप्य पदक (स्टीपलचेज)
- पुरूष संघ - रौप्य पदक (लॉन बॉल)
- जॅस्मीन लॅंबोरिया - कांस्य पदक (बॉक्सिंग)
- पूजा गहलोत - कांस्य पदक (कुस्ती ५० किलो)
- रवि कुमार दहिया - सुवर्ण पदक (कुस्ती ५३ किलो)
- विनेश फोगाट - सुवर्ण पदक (कुस्ती ५३ किलो)
- नवीन - सुवर्ण पदक (कुस्ती ७४ किलो)
- पूजा सिहाग - कांस्य पदक (कुस्ती)
- मोहम्मद हुसामुद्दीन - कांस्य पदक (बॉक्सिंग)
- दीपक नेहरा - कांस्य पदक (कुस्ती ९७ किलो)
- सोनलबेन पटेल - कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)
- रोहित टोकस - कांस्य पदक (बॉक्सिंग)
- भाविना पटेल - सुवर्ण पदक (पॅरा टेबल टेनिस)
- भारतीय महिला संघ - कांस्य पदक (हॉकी)
- नीतू घांघास - सुवर्ण पदक (बॉक्सिंग)
- अमित पंघल - सुवर्ण पदक (बॉक्सिंग)
- संदीप कुमार - कांस्य पदक (१० किमी चालणे)
- एल्डहॉस पॉल - सुवर्ण पदक (तिहेरी उडी)
- अब्दुला अबुबकर - रौप्य पदक (तिहेरी उडी)
- अन्नू रानी - कांस्य पदक (भालाफेक)
- निकहत जरीन - सुवर्ण पदक (बॉक्सिंग)
- अचंत आणि जी. साथियान - रौप्य पदक (टेबल टेनिस)
- सौरव आणि दीपिका पल्लीकल - कांस्य पदक (स्क्वॉश)
- किदाम्बी श्रीकांत - कांस्य पदक (बॅडमिंटन)
- महिला संघ - रौप्य पदक (क्रिकेट)
- गायत्री आणि त्रिशा जॉली - कांस्य पदक (बॅडमिंटन)
- अचंत आणि श्रीजा अकुला - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
- सागर अहवालत - रौप्य पदक (बॉक्सिंग)