नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी १०७ पदकं जिंकल्यानंतर भारतीय शिलेदारांनी आशियाई पॅरा स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम ठेवले. आशियाई पॅरा स्पर्धा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत ६४ पदकं जिंकली असून यामध्ये १५ सुवर्ण, २० रौप्य आणि २९ कांस्य पदकांचा समावेश आहे. खरं तर आशियाई पॅरा स्पर्धेच्या क्रमवारीत भारत आताच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे.
उझबेकिस्तानला १७ सुवर्ण पदकांसह १७ रौप्य आणि २१ कांस्य पदकं मिळाली असून त्यांच्या नावावर एकूण ५५ पदकांची नोंद आहे. याशिवाय चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडने एकूण ६३ पदकं जिंकली आहेत. आशियाई पॅरा स्पर्धेच्या गुणतालिकेत ६९ पदकांसह जपान चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर इराण असून त्यांनी २४ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य पदकं जिंकली आहेत. तर चीनने सर्वाधिक ३०० पदकं जिंकून आपले वर्चस्व कायम राखले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. तसेच भारतीय शिलेदारांचा उत्साह वाढवण्यासाठी खास चारोळ्या लिहित त्यांच्या कामगिरीला दाद दिली. नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंचे अभिनंदन केले.
पदकांच्या यादीत चीन अव्वल स्थानी आशियाई पॅरा स्पर्धा २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकणाऱ्यांच्या यादीत चीन अव्वल स्थानी आहे. चीनने ११८ सुवर्ण पदकांसह ९६ रौप्य आणि ८६ कांस्य पदकं जिंकली आहेत. चीनच्या खात्यात ३०० पदकांची नोंद झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील चीनच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदकं जिंकली होती, त्याचाच प्रत्यय इथेही पाहायला मिळत आहे.