lakshya sen on dipika padukone news :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला एकूण ६ पदके जिंकता आली. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने चमकदार कामगिरी करत पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. दिग्गज खेळाडूंना मात देऊन त्याने विजय साकारले. खरे तर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. मात्र, लक्ष्यचे पदक अगदी जवळच्या फरकाने हुकले. त्याने उपांत्य फेरी ज्या पद्धतीने गाठली हा प्रवास पाहताच तो विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र उपांत्य फेरीत भारतीय स्टारला व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला. मग कांस्य पदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जियानेही लक्ष्यचा पराभव करुन भारताला मोठा धक्का दिला.
कांस्य पदकाच्या लढतीतील पराभवानंतर प्रशिक्षक प्रकाश पादुकोण यांनी लक्ष्यला फटकारले होते. त्यानंतर त्यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्टार बॅडमिंटनला धीर दिला. ज्याबद्दल लक्ष्यने आता खुलासा केला आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना लक्ष्यने दीपिकाबद्दल भाष्य केले. लक्ष्य सेनने सांगितले की, मी उपांत्य फेरीतील पराभवानंतर खूप खचलो होतो. मी देशासाठी पदक जिंकू न शकल्याने नाराज होतो. मी माझ्या परीने खूप चांगली तयारी केली होती. एकूणच माझ्याकडे योग्य रणनीती होती. मी निर्णायक टप्प्यावर थोडे अधिक प्रभावी ठरू शकलो असतो. आता त्या गोष्टी आठवल्यावर फार वाईट वाटते. कांस्य पदक गमावल्यानंतर प्रकाश पादुकोण यांनी रागात म्हटले होते की, भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्याची हीच योग्य वेळ होती. विशेषत: त्यांना सर्व बाजूंनी मिळालेला पाठिंबा लक्षणीय होता.
प्रशिक्षकांनी फटकारले याबद्दल लक्ष्य म्हणाला की, प्रत्येकजण निराश झाला होता, मला याची कल्पना होती. मी त्यांच्या शब्दांचा आदर करतो. यामुळे मला खूप मदत झाली आहे. सामना संपल्यावर विमल सर आणि प्रकाश सर माझ्याशी बोलले. त्यांनी मला सांगितले की मी बऱ्याच गोष्टी बरोबर केल्या आहेत, परंतु काही गोष्टी तू आणखी चांगल्या प्रकारे करू शकला असता. मग थोड्या वेळाने दीपिकाने फोन करुन मला धीर दिला. सगळे ठीक आहे, काळजी करू नकोस. तू खूप चांगल्या प्रकारे खेळलास, असे तिने म्हटले. ती नेहमीच मला पाठिंबा देत आली आहे.