शाहआलम : भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी येथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात हाँगकाँगचा ३-० ने पराभव करीत पहिले पदक निश्चित केले. अव्वल मानांकित चीनला नमवून गटात प्रथम स्थान मिळविणाऱ्या भारताने पी. व्ही. सिंधू, अस्मिता चलिहा आणि अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रिस्टो यांच्या बळावर बाद फेरीचा सामना जिंकला.
भारताला आता जपान आणि चीन यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध उपांत्य सामना खेळावा लागेल. जखमांमुळे अनेकदा खराब खेळ करणाऱ्या सिंधूने यशस्वी पुनरागमन करीत आपल्यापेक्षा कमी रॅंकिंग असलेल्या लो सिन यान हॅप्पी हिचा कडव्या संघर्षात २१-७, १६-२१, २१-१२ ने पराभव केला. यानंतर तनिशा-अश्विनी यांनी ३५ मिनिटांत येयुंग एनगा टिंग- येयुंग पुई सुम यी यांच्यावर २१-१०, २१-१४ ने विजय नोंदविला. अस्मिताने येयुंग यी हिचा २१-१२, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. संघाचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर खुश असल्याने सांगितले.