जागतिक बॉक्सिंगमध्ये भारताला वेगळी ओळख निर्माण करुन दिलेल्या आणि भारताला या क्रीडा प्रकारात आणखी मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावलेल्या आर.के.सचेती यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. आर.के.सचेती भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक होते. (indian boxing federation executive director rk sacheti passes away to due to corona)
सचेती यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याची प्राणज्योत मालवली. भारतीय बॉक्सिंग फेडरेशननं ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. सचेती यांच्या निधनानं भारतीय बॉक्सिंग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
"भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर.के.सचेती यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आर.के.सचेती एक उत्तम प्रशासक आणि आयओसी ऑलम्पिक टास्क फोर्सचे सदस्य होते. त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे", असं ट्विट बॉक्सिंग फेडरेशननं केलं आहे.
क्रीडा मंत्री किरेन रिजेजू यांनीही व्यक्त केलं दु:खदेशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजेजू यांनीही ट्विट करत आर.के.सचेती यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. रिजेजू यांनी सचेती यांच्यासोबतचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. "माझ्या अतिशय जवळचे आणि भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर.के.सचेती यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. भारतीय बॉक्सिंगला अव्वल स्थानावर पोहोचविण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. ऑलम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर दिसावेत अशी त्यांची इच्छा होती आणि ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. सचेती यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे", असं ट्विट रिजेजू यांनी केलं आहे.