नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान रविवारी एक मोठा वाद निर्माण झाला. सिरीजच्या प्रायोजकांपैकी एकासोबत जुळलेल्या अधिकाऱ्याला कथित बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या अधिकाऱ्याने आरोप फेटाळले असून तो निर्दोष असल्याचे म्हटले आहे. झिम्बाब्वे मीडियामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे वृत्त झळकल्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यात क्रिकेटपटूच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. या वृत्तात असे नमूद करण्यात आले होते की, आफ्रिकी देशातील भारतीय दूत आर. मासाकुई यांनी शनिवारी रात्री हरारे येथील हॉटेलमध्ये खेळाडूची अटक टाळण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान, भारताच्या अधिकृत सूत्रांनी हे वृत्त फेटाळले. त्यात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली, ती सध्या सुरू असलेल्या मालिकेतील प्रायोजकांपैकी एकासोबत जुळलेली आहे. सूत्रांनी सांगितले की,‘हरारेमध्ये बलात्काराच्या कथित आरोपाबाबत भारतीय क्रिकेटपटूच्या मीडियामध्ये आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आम्ही झिम्बाब्वेतील आमच्या दूतासोबत चर्चा केली. हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. कुठल्याही भारतीय खेळाडूचा यात समावेश नाही.’सूत्राने पुढे म्हटले की, ‘प्रायोजकांसोबत जुळलेल्या एका भारतीयाला अटक करण्यात आली. त्याने आरोप फेटाळून लावताना डीएनए चाचणी देण्याची तयारी दर्शवली. आमचे दूत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.’ बीसीसीआयने यावर भाष्य करण्यास नकार दिला असून प्रकरण काय आहे, याची सत्यता जाणून घेणार असल्याचे म्हटले आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘आमचे या प्रकरणावर लक्ष आहे. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सत्यता जाणून घेतल्याशिवाय कुठलेही भाष्य करता येणार नाही.’ (वृत्तसंस्था)हे आरोप निराधार आहेत. या प्रकरणात भारतीय क्रिकेट किंवा सामन्याधिकाऱ्याचा समावेश नाही. या घटनेसोबत आमचे काही देणे-घेणे नाही. बीसीसीआय किंवा संघासोबत संबंध नसलेल्या व्यक्तीचा या घटनेत समावेश असेल तर आम्ही यावर भाष्य करू शकत नाही. बीसीसीआयचे कर्मचारी किंवा सपोर्ट स्टाफ किंवा खेळाडूंचा या घटनेसोबत कुठलाच संबंध नाही, हे मी स्पष्ट करतो.- अनुराग ठाकूर, बीसीसीआय अध्यक्ष
बलात्कार प्रकरणाशी भारतीय क्रिकेट खेळाडूचा संबंध नाही
By admin | Published: June 20, 2016 3:18 AM