ढाका : भारतीय तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शानदार खेळ करत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य आशी एकूण ९ पदकांची कमाई केली.या शानदार कामगिरीसह भारतीय खेळाडूंनी २०१८ युवा आॅलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. हरयाणाच्या १५ वर्षांच्या हिमानी कुमारीने मंगोलियाच्या बायास्गालन बादमजुआनीला रिकर्व कॅडेट स्पर्धेत ७-१ने पराभूत करत कांस्यपदक पटकावले. तसेच युवा आॅलिम्पिकचा कोटा मिळवला. यात दोन भारतीयांमध्ये झालेल्या कॅडेट रिकर्व्हच्या अंतिम फेरीत हरयाणाच्या १४ वर्षांच्या अकर्ष याने आंध्र प्रदेशच्या धीरज बोम्मादेवरे याला ६-४ असे पराभूत करत युवा आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळवले.या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या ब्युनसआर्यसमध्ये होणा-या २०१८ युवा आॅलिम्पिकसाठी कोटा मिळवला जाऊ शकतो. जयंत तालुकदार,अतनु दास आणि यशदेव या भारतीय संघाला वरिष्ठ पुरुष रिकर्व्ह स्पर्धेत कोरियाच्या संघाकडून १-५ असा पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.भारताला बिगर आॅलिम्पिक कंपाऊंडमध्ये दोन सुवर्णपदके मिळाली. अभिषेक वर्माने कोरियाच्या किम जोंग्होला मात देत सुवर्णपदक पटकावले. वर्मा पुरुष संघाला सुवर्ण मिळवून देण्यात अपयशी ठरला. वर्मा, गुरविंदर सिंह आणि रजत चौहान यांना सांघिक कंपाऊंडमध्ये कोरियाकडून २३२-२३४ असा पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.ज्योती सुरेखा वेन्नाम, तृषा देव आणि प्रवीणा यांच्या भारतीय महिला कंपाऊंड संघाने सो चाईवोन, चोई बोमिन आणि सोंग यून सू ला कडव्या लढतीत २३०-२२७ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. (वृत्तसंस्था)या स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करताना भारतीय खेळाडूंनी पुढील वर्षी होणा-या युवा आॅलिम्पिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवला.
भारतीयांनी साधले तीन सुवर्णवेध, आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:25 AM