Commonwealth Games 2022 गुरुवारपासून (२८ जुलै) बर्मिंगहॅममध्ये सुरू होत आहे. उद्घाटन समारंभात भारतातील खेळाडूंचे शिष्टमंडळ देखील सहभागी होणार आहे. भारताचा 'गोल्डन बॉय' भालाफेकपटू नीरज चोप्रा याने नुकतेच एका स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले. कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धांसाठी ध्वजवाहक म्हणून भारतातर्फे भालाफेकपटू नीरज चोप्रा असणार होता, मात्र दुखापतीमुळे तो आता राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार नाही. अशा परिस्थितीत भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान तितक्याच खास खेळाडूला देण्यात आला आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) बुधवारी संध्याकाळी घोषणा केली की असोसिएशनची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला भारताचा ध्वजवाहक म्हणून मान मिळणार आहे. तिच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेली पीव्ही सिंधू बर्मिंगहॅम येथील उद्घाटन समारंभात शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे.
स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा टीम इंडियाकडून सुवर्णपदकाचा सर्वात मोठा दावेदार होता. त्याने नुकतेच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही रौप्य पदक जिंकले होते, परंतु त्याच अंतिम स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. यानंतर नीरज चोप्राची वैद्यकीय चाचणी झाली असता त्याला एक महिन्याची विश्रांती देण्यात आली. आता त्याला दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तंदुरुस्त होण्याचा आणि लवकरच ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नीरज चोप्राने स्वत: दिली.
कॉमनवेल्थ गेम्स २८ जुलै ते ८ ऑगस्ट
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्स सुरू होत आहेत, हे गेम्स 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. राष्ट्रकुल खेळांमध्ये भारत अनेकदा चांगली कामगिरी करतो आणि टॉप-3 मध्ये स्थान मिळवतो. अशा परिस्थितीत यावेळीही भारत येथे इतिहास रचण्याची अपेक्षा आहे. नीरज चोप्रा व्यतिरिक्त भारताला या राष्ट्रकुल स्पर्धेत पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, रवी दहिया, निखत झरीन, मनिका बत्रा यांच्यासह इतर अनेक खेळाडूंकडून सुवर्णपदकाच्या आशा आहेत.