नवी दिल्ली : दक्षिण आशियाई ज्युनिअर टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकहाती दबदबा राखताना स्पर्धेच्या अंतिम दिवशी आणखी सहा सुवर्ण जिंकताना स्पर्धेच्या सर्व १० सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्याचबरोबर भारताने चार रौप्यपदकांचीही कमाई करताना एकूण १४ पदकांची लयलूट केली. कोलंबोजवळील माऊंट लावीनिया येथे पार पडलेल्या या तीन दिवसांच्या स्पर्धेतील पहिल्या दोन दिवशी भारताने चार सांघिक सुवर्ण जिंकल्यानंतर, दोन दुहेरी स्पर्धांमध्ये वर्चस्व राखले. यानंतर संध्याकाळी एकेरी गटातही सुवर्णकमाई केली. दरम्यान, याआधीच भारत व श्रीलंकेच्या ज्युनिअर खेळाडूंनी आशियाई ज्युनिअर स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला. ही स्पर्धा कोरिया (अनसान) येथे २९ जून ते ४ जुलैदरम्यान पार पडेल. मुलांच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडू आमने-सामने आले. अव्वल मानांकित मानव ठक्करने पार्थ वीरमानीचे आव्हान ११-६, ६-११, ११-७, ११-९ असे परतवून सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलींचा अंतिम सामनाही भारतीयांमध्ये झाला. यामध्ये अव्वल मानांकीत अर्चना कामतने सरळ : गेममध्ये बाजी मारताना द्वितीय मानांकीत प्रियांका पारिखला ११-९, ११-५, ११-७ असे नमवले. (वृत्तसंस्था)
भारतीय ज्युनिअर्स खेळाडूंनी दाखवला ‘दस का दम’
By admin | Published: May 22, 2017 2:35 AM