नवी दिल्ली : 13 व्या दक्षिण आशियाई गेम्ससाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाकडून पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 1 ते 10 डिसेंबरदरम्यान नेपाळच्या काठमांडू येथे होणार आहे.दक्षिणा आशियाई गेम्समध्ये खो-खो चा सहभाग झाल्यापासून पहिल्यांदा 2016 साली पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अव्वल स्थानी येत चमक दाखवली. यावेळी देखील काठमांडू येथे होणा-या या स्पर्धेत आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. नुकतीच नेपाळ विरुद्ध टेस्ट सामने पार पडल्याने दोन्ही संघांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाराष्ट्राचा बाळासाहेब पोकर्डे हा पुरुष संघाचे नेतृत्व करेल. पोकार्डेने गेल्या गेम्समध्ये पदार्पण केले. त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात आपले योगदान दिले. यावेळी देखील जेतेपद कायम राखण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. "आमचा प्रयत्न संघात समतोल राखण्याचा आहे. आमचे संघ संतुलन व मॅट अशा दोन्ही बाजूंनी आम्ही आघाडीवर आहोत. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवू," असा विश्वास पोकर्डेने व्यक्त केला. महिला संघाची कर्णधार नसरीनने आपण जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले. "गेल्या एक महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत. आम्ही या स्पर्धेतील एक मजबूत संघ आहोत. नेपाळमध्ये स्पर्धा होत असल्याने ते नक्कीच आव्हान देतील. पण, जेतेपद कायम राखण्यासाठी व आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आम्ही सज्ज आहोत," असे नसरीन म्हणाली.
संघ पुढीलप्रमाणे :- पुरुष संघ : बाळासाहेब पोकार्डे ( कर्णधार), राजू बुचान्नागरी, सागर पोद्दार, श्रेयस राऊळ, अक्षय गणपुले, सुदर्शन, दिपक माधव, अभिनंदन पाटील, सत्यजित सिंग, सुरेश सावंत, मुनीरबाशा, धानवीन खोपकर, सिबीन मैलांकील, जगदेव सिंग, तपन पौल.
- महिला संघ : नसरीन (कर्णधार), काजल भोर, प्रियांका भोपी,ऐश्वर्या सावंत, पौर्णिमा सकपाळ,कृष्णा यादव, निकिता पवार,अपेक्षा सुतार, सस्मिता शर्मा, इशिता बिश्वास, मुकेश, माया, परवीन निशा, कलाईवनी काथिरकमन.