एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यावरील आपली विजयी घोडदौड कायम राखताना यजमान बेल्जियमला २-१ असा धक्का दिला. जागतिक आणि युरोपियन विजेते असलेल्या बेल्जियमला पराभूत करत भारतीय संघाने या दौऱ्यावरील आपला सलग चौथा विजय मिळवला.
अमित रोहिदास याने १०व्याच मिनिटाला अप्रतिम गोल करत भारताला आघाडीवर नेले. याशिवाय सिमरनजीत सिंग याने ५२व्या मिनिटाला गोल करत संघाचा दुसरा गोल नोंदवला. बेल्जियमकडून फेलिक्स डेनयार याने ३३व्या मिनिटाला एकमेव गोल केला. याआधीच्या सामन्यात स्पेनला ५-१ अशी धूळ चारलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली. १०व्या मिनीटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना रोहिदासने संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने तुफानी खेळ करताना बेल्जियमला पुनरागमनाची संधी दिली नाही.
बेल्जियमनेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रत्यत्न करताना प्रतिआक्रमण केले, मात्र भारताच्या भक्कम बचवापुढे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने शानदार बचाव करताना बेल्जियमचे आक्रमण रोखताना त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. या दमदार विजयानंतर आता भारतीय संघ गुरुवारी पुन्हा एकदा बेल्जियमविरुद्ध भिडेल.