मुंबई - भारतीय नौदलाच्या पश्चिम नेवल कमांडतर्फे उद्या होणा-या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे काऊंटडाउन सुरु झाले आहे. या मॅरेथॉनचे वैशिष्टय म्हणजे नौसैनिकांबरोबर सर्वसामन्यांसुद्धा या स्पर्धेत सहभागी होता येते. जवळपास दहा हजारपेक्षा जास्त स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावतील अशी अपेक्षा आहे तसेच प्रेक्षक सुद्धा मोठया संख्येने सहभागी होतील. भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे.
नौदलाची सर्वसामान्यांसोबतची नाळ अधिक घट्ट करणे, तंदुरुस्त आयुष्य जगण्याला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करणे हा हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्यांना नौसैनिकांसोबत धावायची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. दहा हजार स्पर्धकच मुख्य सेलिब्रिटी आहेत. प्रेक्षक आणि स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी नौदलाचा बॅण्ड आणि बॉलिवूडची लोकप्रिय गाणी वाजवण्यात येतील.
एअरक्राफ्ट कॅरियर रन 21.1 किलोमीटर, डिस्ट्रॉयर रन 10 किलोमीटर आणि फ्रिगेट रन 5 किलोमीटर अशा तीन प्रकारात ही मॅरेथॉन होईल. 8 हजार नागरीकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. बांद्रा पूर्वेला एमएमआरडीएच्या आर 2 मैदानावर ही स्पर्धा होईल. भारतीय नौदलासोबत जोडले जाणे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. आम्ही या स्पर्धेचे प्रायोजक आहोत ही आनंदाची बाब आहे. यातून देशभक्तीची भावना जागृत होते असे साई इस्टेट कन्सलटंटसचे संचालक अमित वाधवानी यांनी सांगितले.