गुडगाव : एस.एस.पी. चौरसिया रविवारी इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेत जेतेपद राखण्यात यशस्वी ठरला. केवळ सात शॉटमध्ये जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. तिसऱ्या दिवसाअखेर स्पेनचा कार्लोस पिगेम व इंग्लंडचा एडी पेपरेल यांच्यासह संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या चौरसियाने आज एकमेव आघाडी घेतली. कट प्राप्त करणाऱ्या ६९ गोल्फरपैकी ४२ खेळाडूंनी तिसऱ्या फेरीचा खेळ पूर्ण केल्यानंतर चौरसियाची एकमेव आघाडी निश्चित झाली. २९१६६० डॉलर पुरस्कार राशीचा मानकरी ठरल्यानंतर प्रतिक्रिया देताना चौरसिया म्हणाला,‘जेतेपद राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला. या आठवड्यात मी नशिबवान ठरलो. माझे १० अंडरचे भाकीत खरे ठरल्यामुळे आनंद झाला.’आशियाई टूर स्पर्धेत चौरसियाचा हा सहावा विजय आहे. चौरसियाने अंतिम फेरीत एक अंडर ७१ च्या स्कोअरसह एकूण १० अंडर २७८ चा स्कोअर नोंदवला. इंडियन ओपनमध्ये जेतेपद राखणारा तो तिसरा गोल्फर ठरला. यापूर्वी ज्योती रंधावा (२००६, ०७) आणि जपानचा केंजी होसोइशी (१९६७, ६८) यांनी अशी कामगिरी केली आहे. मलेशियाच्या गेविन ग्रीनने (२८५) अंतिम फेरीत तीन ओवरचा स्कोअर नोंदवित दुसरे स्थान पटकावले. इटलीचा मातिया मनासेरो व स्कॉटलंडचा स्कॉट जेमीसन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी होते. भारताच्या अनिर्बान लाहिडीने एकूण २८७ च्या स्कोअरसह संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले. चिराग कुमार संयुक्त २२ व्या तर एस. चिकारंगप्पा संयुक्त ३४ व्या स्थानी राहिले. (वृत्तसंस्था)
इंडियन ओपन गोल्फ स्पर्धा - चौरसियाने जेतेपद राखले
By admin | Published: March 13, 2017 3:31 AM