Anupama Upadhyay: भारताची युवा बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय हिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (BWF) ताज्या ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानी (Junior World Number 1 in BWF rankings) धडक मारली. मुलींच्या अंडर-19 एकेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी भारतीय बनली. या वर्षी युगांडा आणि पोलंडमध्ये आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या पंचकुलाच्या १७ वर्षीय अनुपमाने मंगळवारी भारताच्या तस्नीम मीरला क्रमवारीतील अव्वल पदावरून धक्का दिला. अनुपमाने १८ स्पर्धांमध्ये १८.०६० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे तिला दोन स्थानांचा फायदा झाला. अनुपमा ज्युनियर क्रमवारीत पहिल्या १० मधील चार भारतीय मुलींपैकी एक आहे. Top 10 मधील इतर तीन भारतीय मुलींमध्ये तस्नीम (दुसऱ्या), १४ वर्षांची अन्वेषा गौडा (सहाव्या) आणि उन्नती हुडा (नवव्या) यांचा समावेश आहे.
ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याच्या बाबतीत अनुपमा ही सहावी भारतीय ठरली. मुलांच्या एकेरी गटात आदित्य जोशी (२०१४), सिरिल वर्मा (२०१६), लक्ष्य सेन (२०१७) यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, तर १८ वर्षीय शंकर मुथुसामी सुब्रमण्यनने गेल्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला होता. मुलींच्या गटात भारताची तस्नीम अव्वल होती. मात्र तिला अनुपमाने धक्का देत अव्वल स्थान पटकावले.
अनुपमाने अलीकडेच वरिष्ठ महिलांच्या गटात अव्वल १०० मध्ये प्रवेश केला आणि सध्या ती जागतिक क्रमवारीत ६३व्या स्थानावर आहे. अनुपमाने जानेवारीमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर ऑर्लीन्स ओपन सुपर 100 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. ती सध्या आगामी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. ही स्पर्धा १७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत स्पेनच्या सँटेनर येथे खेळवली जाणार आहे.