PWR DUPR India Masters Pickleball Championship स्पर्धेचा पहिला हंगाम रविवारी संपला. DLTA स्टेडियममध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यात भारताच्या अरमान भाटीयाने रोमहर्षक विजय मिळवला. अमेरिकेच्या डस्टीन बोयर याच्याविरूद्ध खेळताना अरमानने ८-११, ११-९, ११-८ असा सामना जिंकला आणि विजेतेपद पटकावले.
पहिल्या गेममध्ये आधी अरमान भाटियाने ३-०ने आघाडी घेतली होती. त्यानंतर डस्टीन बोयरने आधी ६-३ ची आघाडी घेतली आणि त्यानंतर पहिला गेम ११-८ असा जिंकला. पहिला गेम गमावल्यानंतर अरमान डगमगला नाही. त्याने दुसऱ्या गेममध्ये आक्रमण केले आणि दुसरा गेम ११-९ असा जिंकला. अरमानने सामन्यात बरोबरी केल्यावर सामना कुणाच्या पारड्यात झुकणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. त्याचे उत्तर लगेच मिळाले.
तिसऱ्या आणि अखेरच्या गेमला सुरुवात होताच खेळ वेगाने पुढे जात गेला. पहिल्या ५ गुणांपर्यंत दोघांमध्ये काँटे की टक्कर होती. त्यानंतर हळूहळू दोघांच्या गुणांचे अंतर वाढत गेले. पण काही क्षणात बोयरने पुन्हा कमबॅक केला. त्याने आक्रमक खेळ करायचा प्रयत्न केला पण त्याचा त्याला फटका बसला. अरमान भाटीयाने ११-९ ने तिसरा गेम जिंकला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.