praggnanandhaa vs carlsen : भारताच्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करत तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अवघ्या १८व्या वर्षी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारून त्यानं विश्वविजेत्या खेळाडूला टक्कर दिली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय शिलेदारानं ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदासमोर नंबर १ मॅग्नस कार्लसनचं मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा सामना करताना भारताच्या खेळाडूला अपयश आलं असलं तरी त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासातच विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अंतिम सामन्यात त्याला नंबर १ मॅग्नस कार्लसनकडून हार पत्करावी लागली असली तरी अठराव्या वर्षी फायनल खेळणं हिच अभिमानास्पद बाब आहे. कार्लसनला त्यानं मुख्य फेरीतील दोन्ही लढतीत ड्रॉ वर समाधानी मानण्यास भाग पाडले. पण, कार्लसनने अनुभव पणाला लावताना पहिल्या रॅपिड गेममध्ये बाजी मारून आघाडी घेतली. पण, कार्लसनने दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञाननंदाला ड्रॉ मानण्यास भाग पाडले अन् पहिला वर्ल्ड कप उंचावला.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर प्रज्ञाननंदाने पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताला आपली यशोगाथा सांगितली. "अंतिम सामन्यात मी शांतपणे खेळत होतो, मला काहीही वाटत नव्हते आणि मला फक्त माझे सर्वोत्तम द्यायचे होते. मी अधिक चांगले खेळू शकलो असतो, पण जे झालं ते ठीक आहे. मला वाटते की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला आहे आणि मी त्यांचा खूप आभारी आहे", असे प्रज्ञाननंदाने पराभवानंतर सांगितलं.
सामन्याच्या अंतिम काही क्षणाला प्रज्ञाननंदाने वझीर मारताच कार्लसनने त्याच्या उंटाची चाल चालली अन् भारतीय खेळाडूचा वझीर घेतला. प्रज्ञावर वेळेचं दडपण वाढत चालले. प्रज्ञाननंदाकडे सामना ड्रॉ खेळण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता, तरीही भारतीय चाहत्यांना चमत्काराची अपेक्षा होती. १९व्या चालीनंतर हा सामना ड्रॉ राहिला अन् मॅग्नसने पहिला वर्ल्ड कप जिंकला. प्रज्ञाननंदाला जरी अपयश आलं असलं तरी त्याची इथपर्यंतची मजल कौतुकास्पद नक्की आहे.