टोकियो : कोरोनाच्या दहशतीखाली सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू सोमवारी सरावात व्यस्त झाले. यंदा पदक जिंकण्याच्या इराद्यानेच लढत द्यायची, या निर्धारासह प्रत्येक जण घाम गाळत आहे. भारताचे पहिले पथक रविवारी नवी दिल्लीतून येथे दाखल झाले. याशिवाय काही भारतीय खेळाडू वेगवेगळ्या देशातून येथे आधीच पोहोचले आहेत.
तिरंदाज दीपिका कुमारी, अतानु दास, टेटे खेळाडू जी. साथियान आणि अचंता शरथ कमल, बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत, देशाचे प्रतिनिधित्व करीत असलेली एकमेव जिम्नॅस्ट प्रणिती नायक यांनी आज सरावाला सुरुवात केली.
अतानु आणि दीपिका यांनी सकाळी साथियान आणि शरथ यांनी दुपारी सराव केला. जिम्नॅस्ट प्रणितीनेदेखील कोच लक्ष्मण शर्मा यांच्या मार्गदर्शनात सकाळच्या सत्रात सराव केला. चिराग शेट्टी, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी या दुहेरी जोडीने कोच मॅथियस बो यांच्या मार्गदर्शनात कोर्टवर बराच वेळ घाम गाळला.
व्ही. सरवणनसह नौकायान पथकातील खेळाडूृंचा सराव मात्र रविवारी सुरू झाला. सरवणन (पुरुष लेजर वर्ग), नेत्रा कुमानन, केसी गणपथी आणि वरुण ठक्कर हे मागच्या आठवड्यात टोकियोत दाखल झाले होते. भारताचे १५ सदस्यांचे नेमबाजी पथकदेखील सोमवारी रेंजवर गेले. आयोजन समितीच्या नव्या निर्देशानुसार हे खेळाडू क्रोएशियातून येथे दाखल झाल्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा नियम लागू नव्हता.
व्हॉलिबॉलपटू, जिम्नॅस्ट पॉझिटिव्ह
- झेक प्रजासत्ताकचा व्हॉलिबॉलपटू आंद्रेज पेरुसिच आणि अमेरिकेची महिला जिम्नॅस्ट सोमवारी पॉझिटिव्ह आढळली.
- हे खेळाडू क्रीडाग्राममध्ये झालेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आले.
- महिला जिम्नॅस्ट चीबा प्रांतात सराव करीत होती. यासोबतच ऑलिम्पिकशी संबंधित पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८ वर गेली आहे, अशी माहिती आयोजन समितीने दिली.
- काल द. आफ्रिकेचे दोन फुटबॉलपटू आणि व्हिडिओ विश्लेषक पॉझिटिव्ह आढळले होते.
बंदीनंतरही पत्रकारांची संख्या वाढली
- ऑलिम्पिकचे वृत्तांकन करण्यासाठी टोकियोत दाखल झालेल्या पत्रकारांची संख्या शेकडोच्या घारात आहे.
- १४ दिवसांच्या वास्तव्यास सर्व पत्रकारांना कोविडचे कठोर नियम पाळावे लागणार आहेत. पत्रकारांचे वास्तव्य हाॅटेल ते आयोजन स्थळ असेच असेल.
- याशिवाय दरदिवशी कोरोना चाचणी आणि वास्तव्याचे ठिकाण सांगणे बंधनकारक असेल. विदेशी पत्रकारांना इतरत्र फिरण्याची मुभा नाही.