त्रिनिदाद : पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागलानंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर निर्धारीत ४३ षटकात वेस्ट इंडिजविरुध्द ५ बाद ३१० धावांचा हिमालय उभारला. पावसामुळे उशीराने सुरु झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (१०३) व शिखर धवन (६३), कर्णधार विराट कोहली (८७) यांचे अर्धशतक या जोरावर भारताने विंडिज गोलंदाजांची धुलाई केली. पोर्ट आॅफ स्पेन येथे यजमानांनी नाणेफेक जिंकत पाहुण्या टीम इंडियाला अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर रहाणे - धवन यांनी चौफेर फटकाबाजीस सुरुवात केली. त्यांनी खराब चेंडूंना सीमापार धाडतानाच काही चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मानही दिला. कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता दोन्ही सलामीवीरांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली. सलग दुसऱ्या सामन्यात रहाणे - धवन यांनी शतकी भागीदारी करताना भारताला ११४ धावांची सलामी दिली. अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर धवन यष्टीचीत झाला. त्याने ५९ चेंडूत १० चौकारांसह ६३ धावा केल्या. यानंतर रहाणे - कोहली यांनी सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना ९७ धावांची भागीदारी करुन यजमानांना दमवले. रहाणे शतक झळकावल्यानंतर लगेच बाद झाला. त्याने १०४ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह १०३ धावा केल्या. यावेळी, सर्वांच्या नजरा मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यावर होता. परंतु, तो केवळ ४ धावांवर परतल्यानंतर युवराज सिंगही झटपट बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला. मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या कोहलीने मोक्याच्यावेळी गती वाढवताना भारताला तिनशेच्या पलीकडे नेण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने ६६ चेंडूत ४ चौकार व ४ षटकार ठोकत ८७ धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये एमएस धोनी (१३*) व केदार जाधव (१३*) यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारताने मोठी धावसंख्या रचली. (वृत्तसंस्था)धावफलक-भारत : अजिंक्य रहाणे त्रि. गो. कमिन्स १०३; शिखर धवन यष्टीचीत होप गो. नर्स ६३; विराट कोहली झे. नर्स गो. जोसेफ ८७; हार्दिक पांड्या झे. कमिन्स गो. जोसेफ ४; युवराज सिंग झे. होप गो. होल्डर १४; एमएस धोनी नाबाद १३; केदार जाधव नाबाद १३; अवांतर - १३; एकूण : ४३ षटकात ५ बाद ३१० धावा.गोलंदाजी : अल्झारी जोसेफ ८-०-७३-२; जेसन होल्डर ८.५-०-७६-१; अॅश्ले नर्स ९-०-३८-१; देवेंद्रो बिशू ९-०-६०-०; मिग्युएल कमिन्स ८-०-५७-१; जोनाथन कार्टर ०.१-०-२-०.‘३०० पार’चा विक्रमएकदिवसीय सामन्यांत ९६ वेळा ३०० हून अधिक धावा करण्याचा भारताने आज विक्रम केला. यापूर्वी आॅस्ट्रेलियाने ९५ वेळा अशी कामगिरी केली होती. भारताने ४१८ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली आहे.
भारताचा धावांचा एव्हरेस्ट
By admin | Published: June 26, 2017 1:29 AM