चांगवॉनः भारताचा 23 वर्षीय ओम प्रकाश मिथर्वालने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 50 मीटर पिस्तुल प्रकारात 564 गुणांच्या कमाईसह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर पिस्तुल वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय नेमबाज आहे. स्पर्धेतील या प्रकारात 2014साली जितू रायने रौप्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर पदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय आहे. मात्र, यंदा जितू रायला अपयश आले आणि त्याला 552 पदकांसह 17व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 50 मीटर पिस्तुल प्रकार ऑलिम्पिकमध्ये नसल्याने मिथर्वालला ऑलिम्पिकला कोटा मिळू शकलेला नाही. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिथर्वालने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 10 मीटर एअर पिस्तुल आणि 50 मी. पिस्तुल प्रकारांत कांस्यपदकं जिकंली होती. त्याने 10 मीटर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीत 584 गुणांची नोंद करताना राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाशी बरोबरी केली होती. दरम्यान महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेर, हीना सिधू आणि श्वेता सिंग यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. त्यांना अनुक्रमे 13, 29 व 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.