मॅक्सिको : येथे सुरू असलेल्या विश्वचषक शॉटगन स्पर्धेच्या पात्रता फेरीतच भारताच्या जोरावर सिंग संधू, कयनान चेनाई आणि बीरेनदीप सोढी यांना पुरुष ट्रॅप गटात अपयश आले. पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरल्याने या तिन्ही भारतीय खेळाडूंना स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी महासंघाच्या (आयएसएसएफ) वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यातल्या त्यात जोरावर सिंगने काही प्रमाणात भारताच्या आशा उंचावल्या होत्या. त्याने १२५ पैकी १२१ गुणांचा वेध घेतला. मात्र, अंतिम क्षणी काही गुण हुकल्याने अखेर त्याला आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. याआधी दिल्लीमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जोरावरने ११८ गुणांचा वेध घेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, आॅलिम्पियन कयनान चेनाई १२० गुणांसह १६व्या, तर बीरेनदीप सोढी ११२ गुणांसह ५३व्या स्थानांवर राहिला. दरम्यान, जगातील पाचव्या क्रमांकाचा निशाणेबाज अल्बर्टो फर्नांडिसने सुवर्णवेध घेत वर्चस्व राखले. तसेच, याआधी नवी दिल्ली येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही त्याने रौप्य पटकावले होते. त्याने अंतिम फेरीत एंटोनिया बैलोनला ४५-४२ असे नमवले. तसेच, ब्रिटनच्या अॅरोन हेडिंगने कांस्य पटकावले. आता, डबल ट्रॅप गटात भारताच्या पदकाच्या आशा असून १४ वर्षीय संपत भरद्वाज आणि नवी दिल्ली विश्वचषक स्पर्धेतील रौप्य विजेता अंकुर मित्तल यांच्यावर भारताची मदार असेल. (वृत्तसंस्था)
भारतीय निशाणेबाजांचे विश्वचषक शॉटगनमध्ये अपयश
By admin | Published: March 22, 2017 12:13 AM